सोलापूर : नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी सुरू असलेल्या महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या आवारात थेट प्रतिबंधित मावा तयार करण्याचा अवैध अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी साखर पेठ येथील कै. यशोदाबाई सिद्रामप्पा दिड्डी नागरी आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली असता हा गैरप्रकार समोर आला. आयुक्तांनी तातडीने पोलीसांना बोलावून अवैध अड्ड्यावर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला.
प्रभाग क्रमांक ८ मधील लोकप्रतिनिधींनी आयुक्त डॉ. ओंबासे यांना साखर पेठ परिसरातील नागरी सुविधा व विकासकामांच्या पाहणीसाठी निमंत्रित केले होते. या वेळी आयुक्तांनी आरोग्य केंद्राची पाहणी केली. केंद्राची इमारत जुनी व जीर्ण झाली असून, काही दिवसांपूर्वी रुग्णांची तपासणी सुरू असतानाच छताचे काँक्रीट ढासळल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर इमारतीची दुरुस्ती, वैद्यकीय सुविधा व अपुरे मनुष्यबळ यांबाबत आयुक्तांनी आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच, आमदार विजय देशमुख यांच्या पुढाकारातून शेळगी येथे उभारण्यात आलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या धर्तीवर साखर पेठ येथेही सुसज्ज केंद्र उभारण्यासाठी नवा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
मागील बाजूस पाहणी अन् धक्कादायक प्रकार उघड
मुख्य इमारतीची पाहणी केल्यानंतर आयुक्त डॉ. ओंबासे आरोग्य केंद्राच्या मागील मोकळ्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले. त्या वेळी तिथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. एका भागात सायकल जोडणीचे काम सुरू होते, तर, परिसरातील जाळीच्या दरवाजातून आत पाहिले असता, त्या ठिकाणी लाईट सुरु असल्याने त्या खोलीत आयुक्त गेले असता त्या ठिकाणी चक्क मावा तयार करण्याचा अवैध कारखानाच असल्याचे आढळले.
नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या संवेदनशील शासकीय जागेतच हा घातक उद्योग सुरू असल्याचे पाहून आयुक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. पण, प्रत्यक्षात त्या अड्यावर कोणीही आढळले नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. ओंबासे यांनी पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून कारवाईचे आदेश दिले. जेलरोड पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मावा बनविण्यासाठी लागणारी १०० किलोपेक्षा अधिक सुपारी, तंबाखू, कात, मिक्सर आणि प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या.
संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपअभियंता अविनाश वाघमारे यांच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेत अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला. आरोग्य केंद्राच्या जीर्ण वास्तूत एकीकडे उपचारांसाठी सामान्य रुग्ण येत असताना दुसरीकडे शासकीय जागेचा गैरवापर करून असा बेकायदा उद्योग थाटण्यास कोणाचे अभय होते? केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा प्रकार ठाऊक नव्हता का?
पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते का, असे गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या पाहणी दौऱ्यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक प्रवीण दर्गोपाटील, माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी, उपअभियंता अविनाश वाघमारे, विभागीय अधिकारी राघवेंद्र गायधनकर, कनिष्ठ अभियंता सलमान मणियार आदी उपस्थित होते.
पालिकेच्या जागा आणि अवैध धंदे; यंत्रणांची अर्थपूर्ण डोळेझाक?
महापालिकेच्या अखत्यारीतील जागांमध्ये गैरप्रकार उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१७-१८ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अचानक घेतलेल्या भेटीदरम्यान चिप्पा मार्केट येथील पालिकेच्या जुन्या इमारतीत अवैध कॅफेबार सुरू असल्याचे आढळले होते. त्या ठिकाणी अश्लिलकृत्य करणार्या काही युवक-युवतींना ताब्यात घेऊन, त्यांच्या पालकांना बोलून त्यांच्या समोर समज देण्यात आली होती.
तसेच, अवघ्या सहा महिन्यांपूर्वी कस्तुरबा मंडई परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकाला पालिकेच्याच एका बंद इमारतीत अवैध दारूविक्रीचा अड्डा सुरू असल्याचे आढळले होते. आता थेट रुग्णालयाच्या आवारातच अवैध मावा तयार करण्याचा अड्डा आढळल्याने महापालिका प्रशासन आणि कारवाईचा दिखावा करणारी पोलीस यंत्रणा नेमके काय करते, असा संतप्त सवाल सोलापूरकरांमधून उपस्थित केला जात आहे.
