सोलापूर । सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या ५० वर्षांच्या वाटचालीत पहिल्यांदाच एकाच हंगामात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) तब्बल पाच अधिकृत राष्ट्रीय सामने सोलापुरात होणार आहेत. ऑक्टोबर २०२६ ते जानेवारी २०२७ या कालावधीत येथील ऐतिहासिक इंदिरा गांधी मैदानावर हे सामने पार पडतील, अशी माहिती जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

दर्जेदार खेळपट्टी आणि उत्तम मैदानाची पावती….

इंदिरा गांधी क्रीडांगणाच्या नूतनीकरणानंतर येथे दर्जेदार खेळपट्ट्या आणि सुसज्ज हिरवळ विकसित करण्यात आली आहे. सोलापूरची अनुकूल भौगोलिक परिस्थिती आणि कमी पावसाचे प्रमाण यामुळे हे मैदान क्रिकेटसाठी एक आदर्श केंद्र ठरत आहे. २०२२ ते २०२६ या कालावधीत यशस्वीपणे पार पडलेले सामने, तसेच महाराष्ट्राचे नामवंत खेळाडू राहुल त्रिपाठी आणि प्रशांत सोळंकी यांचे सरावासाठी झालेले आगमन, यामुळे या मैदानाची क्षमता राष्ट्रीय पातळीवर सिद्ध झाली आहे.

क्रीडा पर्यटनालाही मिळेल चालना…

या यशामागे जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार दिलीप माने, उपाध्यक्ष श्रीकांत मोरे, मानद सचिव खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सचिव चंद्रकांत रेंबर्सू, खजिनदार संतोष बडवे यांच्यासह सर्व मार्गदर्शक व सदस्यांचे मोठे योगदान आहे. तसेच मैदानातील कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सहकार्य मोलाचे ठरले. एकाच मोसमात पाच राष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद मिळाल्यामुळे स्थानिक उदयोन्मुख खेळाडूंना देशातील अव्वल खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष अनुभवता येईल. याशिवाय सोलापूरच्या स्थानिक क्रीडा पर्यटनालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास सचिव चंद्रकांत रेंबर्सू यांनी व्यक्त केला.

असे रंगणार पाच राष्ट्रीय सामने…

  • २७ ते ३० ऑक्टोबर २०२६: महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे (कर्नल सी. के. नायडू करंडक)
  • ३ ते ६ नोव्हेंबर २०२६: महाराष्ट्र विरुद्ध हैदराबाद (कर्नल सी. के. नायडू करंडक)
  • २६ ते २९ नोव्हेंबर २०२६: महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ (कूच बिहार करंडक)
  • २६ ते २९ डिसेंबर २०२६: महाराष्ट्र विरुद्ध झारखंड (कूच बिहार करंडक)
  • २५ ते २८ जानेवारी २०२७: महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड (कर्नल सी. के. नायडू करंडक)