सोलापूर : शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात’ हक्काची कामे होत नसल्याने आलेगाव खुर्द (ता. माढा) येथील एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोरच अंगावर डिझेल ओतून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याच्या कृत्यामुळे शिबिरात गोंधळ उडाला. टेंभुर्णी येथे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आलेगाव खुर्द येथील शेतकरी अमोल महादेव देवकाते यांनी गट नं. ५६ च्या उताऱ्यावरील पोकळ बोजा कमी करणे, इतर हक्कातील नाव कमी करणे आणि पाणंद रस्ता खुला करणे यासाठी यापूर्वी अर्ज दाखल केले होते. मात्र, वारंवार हेलपाटे मारूनही कामे होत नाहीत. “गट नं ५६ च्या उता-यात एका संस्थेचा बोजा आहे. तसेच, पाणंद रस्त्यासाठी स्थळ पाहणी झाली आहे. रस्ता होत नाही. तलाठ्याने जाणून बुजून चुका केलेल्या आहेत. यामुळे नागरीकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात,” असा संताप शेतकरी अमोल देवकाते यांनी व्यक्त केला.
काम होत नसल्याच्या संतापातून अमोल देवकते यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील डिझेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेतली. तहसीलदार संजय भोसले यांनी तातडीने स्टेजवरून खाली येत देवकते यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांना स्टेजवर बोलावून त्यांच्या प्रलंबित कामांची सविस्तर माहिती घेतली.
”देवकाते यांनी उता-यावरील बोजा कमी करणे, इतर हक्कातील नाव कमी करणे व पाणंद रस्तबाबत अर्ज केलेला आहे. त्यांनी बोजा कमी करण्यासाठी संबंधित संस्थेचे पत्र आणावे तसेच पाणंद रस्ते व इतर कामांबाबत वरील कार्यालयात अपील करुन निकाल घ्यावा,असे तहसीलदार संजय भोसले यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्हा प्रशासन तर्फे शहर व जिह्यात विविध ठिकाणी समाधान शिबिर सुरू आहेत. शिबाराच्या सुरुवातीला अधिकारी लोकप्रतिनिधी असताना कर्मचारी उपस्थित राहतात. पण, उद्घाटन सोहळ्यानंतर शिबीर विस्कळीत होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मंद्रूप (दक्षिण सोलापूर) येथील शिबिर उद्घाटन नंतर अवघ्या दोन तासांमध्ये गुंडाळण्यात आले. त्यामुळे हे शिबिर फक्त आयोजनाबाबतचे समाधान असून प्रत्यक्षात अंमलबजावणी बाबत निरुत्साहचे चित्र आहे.
