सोलापूर : सोलापूर शहरातील मुरारजी पेठ परिसरातील उच्चदाब वीज टॉवरवर चढलेल्या एका मनोरुग्ण व्यक्तीला पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप खाली उतरवले. सुदैवाने या थरारक घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या बचावकार्यादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य वीजवाहिनी बंद ठेवावी लागल्याने शहर व परिसरातील वीजपुरवठा तब्बल पावणेपाच तास खंडित झाला होता.

मुरारजी पेठ भागातील शेटे वस्ती रोडवर असलेल्या खमितकर अपार्टमेंटसमोर महावितरणचा उच्चदाब वीज टॉवर आहे. सकाळी सुमारे १० ते ११ वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती या टॉवरवर चढल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ही व्यक्ती टॉवरवर चढून खाली उपस्थित असलेल्यांना हुलकावण्या देत होती. उच्चदाबाच्या ‘हॉटलाईन’वर व्यक्ती चढल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली.

सोलापूर उच्चदाब वीज टॉवर मनोरुग्ण (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

घटनेचे गांभीर्य ओळखून महावितरण प्रशासनाने तातडीने संबंधित मुख्य वीजवाहिनीचा प्रवाह बंद केला. माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी सुरुवातीला संवाद साधून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता बाळगत अत्यंत कौशल्याने त्या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवले. प्राथमिक माहितीनुसार, सदर व्यक्ती कर्नाटकातील असून ती मनोरुग्ण असल्याचे समजते.

सोलापुरात उच्चदाब टॉवरवर चढला मनोरुग्ण; ५ तासांच्या थरारानंतर सुखरूप सुटका (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सुरक्षेचा उपाय म्हणून मुख्य वीजलाईन बंद करण्यात आल्यामुळे सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत मुरारजी पेठ, नवी वेस, बाळे आणि लक्ष्मी पेठ या प्रमुख परिसरांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. मुख्य वाहिनी बंद असल्याने ग्रामीण भागातील काही गावांनाही याचा फटका बसला. व्यक्तीला सुखरूप खाली उतरवल्यानंतर आणि तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यावर दुपारनंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. प्रशासनाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.