पंढरपूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा एकदा बार्शीला झुकते माप दिले. जिल्हा परिषद अध्यक्षापाठोपाठ आता विधान परिषदेची उमेदवारी राजेंद्र राऊत यांना दिली. महायुतीतर्फे राऊत यांनी अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे कॉंग्रेसतर्फे आदित्य फत्तेपूरकर व इतरांनी अर्ज दाखल केले. पक्षाने जी जबाबदारी दिली ती पूर्ण करू, असा विश्वास भाजपचे उमेदवार राऊत यांनी व्यक्त केला. तर बिनविरोध निवडणूक करू, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
महायुतीतर्फे अर्ज दाखल करताना महायुतीचे सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते. शिवसेना (शिंदे) खासदार ज्योती वाघमारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अ. प.) संजयमामा शिंदे यासह महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, राऊतसमर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, राऊत अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख हे समर्थकांसहित उपस्थित होते. भाजप आणि शेकापच्या या नव्या युतीची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीला दुसऱ्यांदा राजकीय संधी भाजपने दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त होती. यात माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, शहाजी पवार, रोहन देशमुख, राम सातपुते यांनी दावा केला. मात्र, शेवटी परिचारक का राऊत असे चित्र झाले. अखेर भाजपने बार्शीचे राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली. राऊत यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्याचे बक्षीस म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बार्शीला भाजप श्रेष्ठीने दिले. यानंतर आता विधान परिषदेचे उमेदवारी राजेंद्र राऊत यांना देण्यात आल्याने पुन्हा एकदा बार्शीला भाजपने झुकते माप दिले.
या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने आदित्य ऊर्फ दादा फत्तेपूरकर यांना उमेदवारी दिली. फत्तेपूरकर यांनी अर्ज दाखल केल्यानंतर थेट पालकमंत्री यांना लक्ष्य केले. पालकमंत्री यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि नगरसेवक, सदस्य यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडणूक लढवीत आहे, असे फत्तेपूरकर यांनी जाहीर केले. त्याच बरोबरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (शप) वसंत देशमुख, शिवसेनेचे (शिंदे) महेश साठे, नागेश अक्कलकोटे, धनंजय डिकोळे यांनी अर्ज दाखल केले.
दरम्यान, अर्जाची छाननी २ जूनला, तर अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत ४ जून आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत निवडणूक होणार, की बिनविरोध करण्यात पालकमंत्री यशस्वी होणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. निवडणूक बिनविरोध करू : पालकमंत्री गोरेया निवडणुकीसाठी ६१६ मतदार आहेत.दरम्यान, अर्जाची छाननी २ जूनला, तर अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत ४ जून आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत निवडणूक होणार, की बिनविरोध करण्यात पालकमंत्री यशस्वी होणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. निवडणूक बिनविरोध करू : पालकमंत्री गोरे
त्यांपैकी चारशेच्या आसपास महायुतीची मते आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला विजय सोपा आहे. विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधकांनी इतिहास करून दाखवावा आणि बिनविरोध करावी. यासाठी सर्वांशी चर्चा करीन, असा विश्वास पालकमंत्री गोरे यांनी दाखवला आहे.
महायुतीसोबत शेकाप
महायुतीतर्फे अर्ज दाखल करताना महायुतीचे सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या (शिंदे) खासदार ज्योती वाघमारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अप) संजय शिंदे यांसह महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, राऊतसमर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच वेळी सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख उपस्थित होते. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ वाढणार आहे. ‘हितचिंतक’ खूप आहेत, असे गोरे म्हणाले होते. त्याचा हा एक प्रकार आहे का, अशी कुजबूज सुरू आहे.
परिचारकसमर्थक नाराज
परिचारक यांना उमेदवारी मिळेल असे वाटत होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. २०२१ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत परिचारक इच्छुक होते. मात्र आवताडे यांना तिकीट मिळाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतदेखील आवताडे यांना तिकीट मिळाले. त्या वेळी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विधान परिषदेचा शब्द दिला. मात्र, आता उमेदवारी डावलल्याने समर्थक नाराज झाले. राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. आता ही नाराजी दूर होणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
