सोलापूर : चिंचोली एमआयडीसी (ता. मोहोळ) येथे बनावट देशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत २ कोटी १ लाख ४५ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ‘ऑपरेशन समन्वय’अंतर्गत २९ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. कारवाईत बनावट देशी दारूचे ४३३ बॉक्स, १३,८०० लिटर स्पिरीट, १,२०० लिटर ब्लेंड, बॉटलिंग मशिनरी, मोठ्या प्रमाणावर बनावट बुचे व लेबल्स जप्त करण्यात आले. तसेच ७ वाहनांसह ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या अवैध निर्मितीमुळे सुमारे ७० लाख ४० हजार रुपयांच्या शासकीय महसुलाचे नुकसान झाले आहे. सोलापूरसह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत या बनावट दारूचा पुरवठा केला जात होता. हे गोदाम भाड्याने दिल्याप्रकरणी जागामालकालाही सह-आरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.
आद्योगिक वसाहतीमध्ये बनावट दारुचे उत्पादन होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. आठ दिवस सतत पाळत ठेवण्यात आली होती. उत्पादीत मालसाठा वितरीत होणार असल्याची माहिती मिळताच, उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहिम राबवून छापा टाकला. कारवाईची व्याप्ती मोठी असल्याने जप्तीचा पंचनामा करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला सलग १२ तास काम करावे लागले, असेही अधीक्षक जाधव यांनी सांगितले.
या कारखान्यात काम करणारे बहुतांश कामगार परराज्यातील, विशेषतः बिहारमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यात जप्त केलेल्या सव्वाकोटी रुपयांच्या बनावट दारू प्रकरणाशी या कारखान्याचा थेट संबंध आहे का, यादृष्टीनेही तपास सुरू आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आणि स्प्रिटचा पुरवठा कुठून होत होता, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, चिंचोळी एमआयडीसी भागात काही महिन्यांपूर्वी एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. आता पुन्हा याच भागात बनावट दारूचा कारखाना आढळल्याने एमआयडीसी प्रशासन आणि स्थानिक पोलिसांच्या सुरक्षेवरील प्रश्नचिन्ह अधिक गंभीर झाले आहे.औद्योगिक वसाहतीचा वापर करून राजरोसपणे सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बनावट दारू इतर जिल्ह्यांसह, शेजारच्या राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत होती का याबाबतचा तपास सुरु आहे. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, स्प्रिटचा पुरवठा कुठून होत होता आणि हे जाळे कुठे कुठे पसरले आहे, याचा सखोल तपास उत्पादन शुल्क विभागाकडून केला जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागीय अधिकार्यांच्या मार्गदर्शनखाली या कारवाईमध्ये उपअधीक्षक सौरभ अदाटे, निरीक्षक जे. एन. पाटील, ए. व्ही. घाटगे, आर. के. निंबाळकर, डी. आर. पोवार, ए. बी. सरवदे आदींच्या पथकाचा समावेश होता.
