सोलापूर :प्रशासकीय कामकाजात शिस्त, कामातील एकरूपता आणि नागरिकांसमोर महापालिकेची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या सोमवार (३ ऑगस्ट) पासून महापालिकेच्या वर्ग ‘ब’ ते ‘ड’ मधील सर्व कायमस्वरूपी, मानधन तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान करणे सक्तीचे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या नियमाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दररोज १०० रुपये दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली आहे.

​महापौर विनायक कोंड्याल यांच्या विशेष सूचनेनुसार हा निर्णय अमलात आणण्यात आला आहे. अनेकदा कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये फरक ओळखताना अडचणी येतात, तसेच अनाहूत गोंधळ उडतो. या सर्व बाबींना आळा घालून प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हा पेहराव निश्चित करण्यात आला आहे.

​असा असेल गणवेश:

​या नव्या नियमावलीनुसार पुरुष कर्मचाऱ्यांसाठी निळ्या रंगाचा रेषा असलेला (लाइनिंग) शर्ट आणि गडद निळी (नेव्ही ब्लू) पँट असा गणवेश ठरवण्यात आला आहे.महिला कर्मचाऱ्यांसाठी फिकट जांभळ्या रंगाची साडी किंवा पंजाबी ड्रेस परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य, घनकचरा आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा पूर्वीचाच अधिकृत गणवेश कायम ठेवण्यात आला आहे, तर नगरसचिव कार्यालयातील सेवकांसाठी पूर्णपणे पांढरा गणवेश निश्चित करण्यात आला आहे.

​कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून आधीच दोन गणवेशांचे कापड पुरवण्यात आले असून, कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने ते नियमानुसार शिवून घेतले आहेत.

​७० टक्के कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद:

​हा नवीन नियम लागू होण्यापूर्वीच प्रशासकीय स्तरावर याचे स्वागत झाले आहे. सध्या सोलापूर महापालिकेतील सुमारे ७० टक्के कर्मचारी या नव्या गणवेशातच कार्यालयात उपस्थित राहत आहेत. मात्र, उर्वरित ३० टक्के कर्मचाऱ्यांनीही तात्काळ या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

​कर्मचाऱ्यांकडून नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी संबंधित सर्व विभागप्रमुखांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जर कोणी कर्मचारी विनागणवेश किंवा नियमांचे उल्लंघन करून आढळल्यास, त्याच्याकडून दिवसाला १०० रुपयांची दंडात्मक वसुली केली जाईल. या कडक निर्णयामुळे सोलापूर महापालिकेच्या कामकाजात शिस्त येईल आणि महापालिकेत कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी अधिक विश्वास निर्माण होईल, असा विश्वास आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केला आहे.