सोलापूर : आगामी आषाढी वारी सोहळा ‘स्मार्ट वारी, सुरक्षित वारी’ या संकल्पनेतून यशस्वी करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पावले उचलली आहेत. वारीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ८१ सराईत गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात परेड घेण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील सुमारे दोन हजार गुन्हेगारांकडून शांतता राखण्याचे लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे.

गुन्हेगारांची झाडाझडती.. अन् रोजगाराची संधी वारी व सण-उत्सवांच्या काळात सुव्यवस्था भंग न करण्याबाबत गुन्हेगारांना कडक सूचना देत चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. चुकीचे वागल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला. दुसरीकडे, गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. पात्रतेनुसार रोजगार मिळवून देणे आणि शेती असलेल्यांना मोफत कृषी मार्गदर्शन करून पुनर्वसनासाठी प्रोत्साहित केले जाणार असल्याचे अधीक्षक कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

५जी संपर्क यंत्रणा आणि आधुनिक सुरक्षा यंदाच्या वारीत पोलिसांचे नियोजन अधिक हायटेक असेल. वारकऱ्यांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी टाळण्यावर मुख्य भर आहे. पोलिसांना हेल्मेट, रेनकोट, दोरखंड, फायर ब्लँकेट आणि माईक पुरवण्यात आले आहेत. वारीदरम्यान जलद संपर्कासाठी ५जी (5G) नेटवर्कवर आधारित बिनतारी संदेशवहन यंत्रणा आणि दुर्बिणीचा वापर केला जाणार आहे.

अधिवेशनातील लोकप्रतिनिधींच्या आक्षेपानंतर पोलीस सतर्क सोलापूर शहर व जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि वाढत्या गुंडगिरीचा मुद्दा नुकताच माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. यापूर्वी हिवाळी अधिवेशमध्ये आमदार सुभाष देशमुख यांनीही जिल्ह्यातील अवैध डान्सबारचा मुद्दा मांडला होता. सत्ताधारी आणि विरोधकांनी सोलापूरच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे पोलीस दल सतर्क झाले असून, आषाढी वारी व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ही विशेष खबरदारी घेतली आहे.