सोलापूर । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील घोटाळा आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी सोलापूरात आंदोलन करण्यात आले होते. त्यावरून येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख केल्याने भाजपने काँग्रेसवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना, ‘‘निवडणूक आयोग ही स्वतंत्र व स्वायत्त संस्था असताना भाजप त्यांची वकिली का करत आहे? भाजप आणि निवडणूक आयोगामध्ये नेमके काय साटेलोटे आहे?’’ असा प्रश्न काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी उपस्थित केला.
मंगळवारी भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने केलेल्या टिकेला उत्तर दिले होते. तर, बुधवारी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन भाजपवर पलटवार केला आहे. यावेळी काँग्रसचे माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक नरसिंह आसादे, संजय हेमगड्डी, भीमाशंकर टेकाळे, केशव इंगळे आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
‘भाजपकडून उत्तराची अपेक्षा नाही’
खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोलापुरात हे आंदोलन करण्यात आले होते. देशभरात लाखो-कोट्यवधी मतदारांना नोटिसा पाठवून मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला जात असून, निवडणूक आयोगाच्या कारभारावर खुद्द अधिकाऱ्यांमध्येच मतभेद असल्याचे समोर येत आहे. ‘‘आमचा आक्षेप आणि आरोप निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनी उत्तर द्यावे; भाजपच्या नेत्यांकडून आम्हाला उत्तराची अपेक्षा नाही. मात्र, तरीही भाजप नेते पुढे येऊन वकिली करत असल्याने भाजप आणि निवडणूक आयोगाचे साटेलोटे चव्हाट्यावर येत आहे,’’ असा थेट आरोप शहराध्यक्ष नरोटे यांनी केला.
‘शिंदे कुटुंबीयांवर टीका करणाऱ्यांना कावीळ’
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा समाचार घेताना नरोटे म्हणाले की, ‘‘भाजपच्या काही नेत्यांना शिंदे कुटुंबीयांच्या नावाची कावीळ झाली आहे. काँग्रेसला शहाणपण शिकवणारे भाजपमधील अनेक पदाधिकारी, माजी महापौर आणि लोकप्रतिनिधी हे मूळचे काँग्रेसचेच आहेत. त्यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहून विविध पदे उपभोगली आहेत, अशी टिका काँग्रेसतर्फे करण्यात आली.’
‘कामाचा हिशोब मागण्यापूर्वी स्वतःचे अपयश बघा’
शिंदे यांनी काय केले असा हिशोब मागणाऱ्या भाजप नेत्यांसह, त्यांच्या कायर्पद्धतीवर चाैफर टिका करत, शहराध्यक्ष नरोटे म्हणाले,, ‘‘सोलापूर लोकसभा मतदारसंघात सलग अनेक वर्षे भाजपचे खासदार निवडून आले, राज्यात व केंद्रात सत्ता आहे, महापालिकेतही सत्ता होती; मग सत्ताधाऱ्यांनी सोलापूरसाठी काय केले याचा आधी हिशोब द्यावा. जिल्ह्यात बहुसंख्य आमदार भाजपचे असूनही सोलापूरला बाहेरचा पालकमंत्री आणावा लागतो, यावरूनच भाजपचे स्थानिक नेतृत्व किती कमकुवत आहे हे स्पष्ट होते. सुशीलकुमार शिंदे यांनी शहर, राज्य आणि देशासाठी दिलेल्या योगदानाची बरोबरी भाजप नेत्यांना कधीच करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष….
‘‘सोलापूर शहरात नागरिकांना दोन-दोन दिवस उशिरा पाणी मिळत आहे. सणासुदीच्या काळातही पाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस बंद पडल्या आहेत. या मूलभूत नागरी समस्या सोडवण्याऐवजी भाजप नेते केवळ काँग्रेसवर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत,’’ असा टोलाही नरोटे यांनी लगावला.
