सोलापूर : मनोभावे मांडलेली भक्तिमय पूजा, ओम नमो राघवेंद्राय नम: चा अखंड नामजप आणि मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत झालेली श्री राघवेंद्र स्वामींची महाआरती अशा वातावरणात श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. बंगळुरूहून आलेल्या आकर्षक फुलांनी श्री राघवेंद्र स्वामींचे वृंदावन सजविण्यात आले होते.
जगदगुरु श्री मन्ममध्वाचार्य मूलमहासंस्थान श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालय सोलापूर शाखेतर्फे प्रतिवर्ष होणारा श्री राघवेंद्रस्वामी आराधना महोत्सव यंदाही मंत्रालयम येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीपती श्री श्री १०८ श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांच्या आज्ञेनुसार श्रावण वद्य प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया या तीन दिवसांमध्ये म्हणजेच शनिवार (दि. २९) ते सोमवार (दि. ३१) पर्यंत होत आहे. त्यानिमित्त मुरारजी पेठ येथील श्री राघवेंद्र स्वामी मठात आणि श्री काळजापूर मारुती मंदिराशेजारील श्री राघवेंद्र स्वामी मठात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापुरात होणाऱ्या आराधना महोत्सवाचे यंदाचे ५२ वे वर्ष आहे. शनिवारी (दि.२९) रोजी पूर्वाराधना झाली. त्यानिमित्त पहाटे ५.३० वाजता सुप्रभात, सकाळी ६ वाजता निर्माल्य विसर्जन, सकाळी ७.३० वाजता अष्टोत्तर पारायण, सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक करण्यात आला. दुपारी तुळशी अर्चना व नैवेद्य, हस्तोदक, अलंकार, महामंगलारती व तीर्थ प्रसाद हे धार्मिकविधी झाले. यानंतर शेकडो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. पूर्वाराधनेनिमित्त श्री राघवेंद्र स्वामी मठातील वृंदावन शेवंती, गुलाब आणि रंगीबेरंगी झेंडूच्या फुलांनी आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. त्याची छबी आपल्या भ्रमणध्वनीत टिपण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. रात्री ८ वाजता पालखी सेवा, रथोत्सव, स्वस्तिवाचन महामंगलारती व श्रेय प्रार्थना झाल्यानंतर पूर्वाराधनेची समाप्ती झाली.
मुरारजी पेठ येथील श्री राघवेंद्र स्वामी मठात रविवारी सकाळी प्रवचन आणि भजन होणार आहे. तसेच सायंकाळी ६.३० वाजता प्रशांत देशपांडे आणि सहकाऱ्यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. श्री काळजापूर मारुती मंदिराशेजारील मठात रविवारी (दि. ३०) सायंकाळी ६ वाजता सार्थक बाविकर यांचा कन्नड व मराठी भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
रविवारी मध्याराधनेत प्रयुक्त लक्ष पुष्पार्चन अन् तुळशी अर्चना
रविवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजता दोन्ही मठांमध्ये मध्याराधना प्रयुक्त लक्ष पुष्पार्चन व तुळशी अर्चना करण्यात येणार आहे. तसेच यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास भक्तगणांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री राघवेंद्र स्वामी मठातर्फे करण्यात आले.
