सोलापूर । मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत मोडलिंब ते अरग दरम्यानच्या १४९.६१ किलोमीटर अंतरावर ‘कवच’ ही स्वदेशी स्वयंचलित रेल्वे संरक्षण यंत्रणा यशस्वीरीत्या कार्यान्वित केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रेल्वेगाड्यांची समोरासमोर आणि पाठीमागून होणारी धडक रोखणे शक्य होणार असून, या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित झाली आहे.
सोलापूर विभागात यापूर्वी सोलापूर–वाडी दरम्यानच्या १४९.४७ किलोमीटर अंतरावर ही सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. आता मोडलिंब–अरग मार्गावरील अंमलबजावणीमुळे या विभागातील ‘कवच’ यंत्रणेचे जाळे तब्बल ३०० किलोमीटरपर्यंत विस्तारले आहे. केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेली ही नॉन-सिग्नलिंग यंत्रणा रेल्वे इंजिन आणि ट्रॅक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद राखण्याचे काम करते.
या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित मार्गावर ५७० बिनतारी ओळख उपकरणे बसवून त्यांचे आज्ञावलीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे धावत्या गाडीचे अचूक स्थान आणि वेग निश्चित करणे शक्य होते. तसेच रेल्वे मार्गावर असामान्य परिस्थितीत गाडी थांबल्यास इंजिनमधून नियंत्रण कक्षाला तात्काळ स्वयंचलित आपत्कालीन संदेश जातो; गरज भासल्यास रेल्वे चालकाला स्वतःहून असा संदेश पाठवण्याची सुविधाही उपलब्ध आहे. संशोधन, अभिकल्प व मानक संघटनेच्या (आरडीएसओ) कठोर निकषांनुसार चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच ही यंत्रणा प्रत्यक्ष सेवेत दाखल करण्यात आली आहे.
सोलापूर रेल्वे स्थानक परिसर: ‘नो पार्किंग’मधील ४२ वाहनांवर धडक कारवाई
स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या वाहनांवर धडक मोहीम राबवली. आरक्षण कार्यालयाचा परिसर आणि स्थानक आवारात विनापरवाना पार्क केलेल्या ४२ वाहनांवर शहर वाहतूक पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) संयुक्त कारवाई केली.
- शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने ‘नो पार्किंग’मध्ये आढळलेल्या ३२ दुचाकींना ऑनलाइन ई-चलन लागू केले.
- रेल्वे सुरक्षा दलाने अनधिकृतपणे पार्क केलेल्या १० चारचाकी वाहनांना जॅमर्स लावून रेल्वे कायदानुसार गुन्हा नोंदवला आणि प्रत्येक वाहनाकडून ५०० रुपये दंड वसूल केला.
