सोलापूर : वीकेंडला फिरण्यासाठी केवळ किल्ले, मंदिरे किंवा गर्दीची थंड हवेची ठिकाणेच हवीत हा ट्रेंड आता बदलणार आहे. शहरी गजबजाटापासून दूर, अस्सल खेड्यातील मातीचा गंध, मालदांडी ज्वारीची चुलीवरची गरम भाकरी, थेट पोळ्यातून मध काढण्याचा थरार आणि इतिहासजमा होत चाललेली ‘बारा बलुतेदार’ संस्कृती आता थेट शेताच्या बांधावर अनुभवता येणार आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने ‘ग्रामीण, कृषी आणि सांस्कृतिक’ पर्यटनाला नवा आयाम देत जिल्ह्यातील ११ गावांचा कायापालट करण्याचे ठरवले असून, पहिल्या टप्प्यात तीन गावांसाठी तब्बल ५ कोटी ९५ लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.
नागरिकांचा वाढता ‘वन डे रिटर्न’ पर्यटनाचा कल लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात मंगळवेढ्यातील भालेवाडी, सांगोल्यातील कोळे आणि माळशिरस तालुक्यातील निमगाव मगर या तीन गावांना सज्ज केले जात आहे.
पहिल्या टप्प्यातील ३ गावे
१ – भालेवाडी (मिल्क अँड मिलेट व्हिलेज) : मंगळवेढ्याची प्रसिद्ध मालदांडी ज्वारी आणि भालेवाडीचे मोठे दुग्ध संकलन केंद्रस्थानी ठेवून हे गाव आकारास येत आहे. पर्यटकांना जुन्या वास्तूंचा अनुभव, माहिती दालन, पारंपरिक संग्रहालय, स्वच्छतागृहे आणि प्रशस्त वाहनतळ उपलब्ध होईल. येथे दर्जेदार ४ ते ५ तास घालवता यावेत यासाठी १ कोटी ८७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
२ – कोळे (मधाचे गाव) : सांगोल्यातील हे गाव दर्जेदार मध आणि गोड डाळिंबांसाठी ओळखले जाते. पर्यटकांना निव्वळ मध विकत न देता, शिवार फेरीत प्रत्यक्ष मधसंकलन कसे होते, हे दाखवले जाईल. या अनोख्या प्रयोगासाठी १ कोटी ८० लाख रुपयांच्या कामांना हिरवा कंदील मिळाला आहे.
३ – निमगाव मगर (बारा बलुतेदार हेरिटेज) : नागपंचमीचा प्रसिद्ध वावडी महोत्सव आणि गावात आजही टिकून असलेली ‘बारा बलुतेदार’ जीवनशैली हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असेल. बलुतेदारांच्या पारंपरिक कारागिरांची कला आणि प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. या सांस्कृतिक वारसा प्रकल्पासाठी २ कोटी २८ लाख रुपये खर्च केले जात आहेत.
बोरामणी सफारीचे याच महिन्यात लोकार्पण
शहरालतच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे निसर्ग आणि वन्यजीवप्रेमींसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या ‘बोरामणी ग्रास लँड सफारी’चे काम अंतिम टप्प्यात आले असून, याच महिन्यात ती पर्यटकांसाठी खुली होणार आहे. त्यापाठोपाठ पुढील टप्प्यात माढ्यातील लोंढेवाडी व करमाळा (सेंद्रिय शेती), कात्रज (जलपर्यटन), बार्शीतील कोरेगाव आणि मोहोळमधील लांबोटी येथे ‘इको-टुरिझम’ विकसित केले जाणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या हाताला काम आणि पर्यटकांना अस्सल गावपण देणारा सोलापूरचा हा नवा प्रयोग तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी शाश्वत रोजगार उपलब्ध करुन देईल अशी अपेक्षा आहे.
