सोलापूर: दुर्लभ वाद्यांचे सूर, शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा आणि नृत्याचा नयनरम्य आविष्कार अनुभवण्याची सुवर्णसंधी सोलापूरकर रसिकांना मिळणार आहे. ‘दुर्लभ सुंद्री वाद्य कला अकादमी’, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ३० ऑगस्ट) सोलापुरात ‘संगीत प्रतिभा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. किल्ला बागेसमोरील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात सायंकाळी ५:३० वाजता हा कार्यक्रम रंगेल. हा महोत्सव सर्व संगीतप्रेमींसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष पंडीत भिमण्णा जाधव यांनी दिली.

महोत्सवाची सुरुवात सुंद्रीसम्राट पं. सिद्राम जाधव यांची पणती आणि पं. चिदानंद जाधव यांची नात बालकलाकार कु. कलाश्री भिमण्णा जाधव हिच्या सुंद्री वादनाने होईल. तिला अजय यंगल तबल्याची साथ देतील. त्यानंतर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रगल्भ गायिका सौ. रमा कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन होणार असून, त्यांना नितीन दिवाकर (तबला) आणि राजकुमार सावळगी (संवादिनी) साथसंगत करतील.

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी…..

या महोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे सुंद्री आणि व्हायोलिन वाद्यांची रंगतदार जुगलबंदी. केंद्र सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त बालकलाकार मास्टर व्यंकटेशकुमार जाधव (सुंद्री) आणि ‘ट्रिनिटी स्कूल ऑफ लंडन’मधून प्राविण्य मिळवलेली पुण्याची युवा वादक वेधा विद्याधर पोळ (व्हायोलिन) यांच्यात ही अनोखी संगीत जुगलबंदी रंगेल. त्यांना वेदांत जोशी तबल्यावर साथ करतील.

उपशास्त्रीय गायन अन् नृत्याविष्कार…

ग्वाल्हेर व किराणा घराण्याच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका विदुषी रोझी दत्ता पंडित (कोलकाता) यांच्या उपशास्त्रीय गायनाची मेजवानी रसिकांना मिळेल. त्यांना जोथम कराड (तबला) आणि ओंकार पाठक (हार्मोनियम) साथ देतील.

कार्यक्रमात नृत्याविष्कारही पाहायला मिळणार असून, सोलापूरच्या एकता कांबळे यांचे भरतनाट्यम, तर पं. मयूर वैद्य यांच्या शिष्या अनन्या खोपकर, भूमी नागडा, संयुक्ता रापाटे व हर्षाली म्हात्रे (मुंबई) यांचे बहारदार कथ्थक नृत्य सादर होईल. महोत्सवाचे सूत्रसंचालन साकव फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील करणार आहेत. या अद्वितीय संगीत महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.