सोलापूर – “मी माझ्या आयुष्यात कटफळला एकदा तरी नक्की येईन आणि सर्वांना भेटेन…” ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिलेला हा शब्द आजही सांगोला तालुक्यातील कटफळकरांच्या मनात तितकाच ताजा आहे. दुष्काळाच्या तीव्र दाढेतून गावाला बाहेर काढून पाण्यासाठी स्वावलंबी बनवणारे नाना प्रत्यक्षात गावात येऊन हे जलक्रांतीचे चित्र पाहू शकले नाहीत आणि त्यांची ही भेट कायमची अधुरीच राहिली, अशा हळहळणाऱ्या भावना व्यक्त करत कटफळसह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी नानांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला.

कासाळगंगेचे पुनरुज्जीवन आणि दुष्काळमुक्तीची पहाट…

मराठवाड्यात दुष्काळ निवारणाचे व्यापक कार्य उभे केल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ने पश्चिम महाराष्ट्रात आपल्या कार्याचा विस्तार केला. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील पहिले दुष्काळी गाव म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कटफळची निवड झाली आणि सप्टेंबर २०१७ मध्ये फाउंडेशनने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. सुमारे साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या कटफळ गावातून वाहणाऱ्या कासाळगंगा ओढ्याचे साडेसहा किलोमीटर अंतराचे खोलीकरण व रुंदीकरण हाती घेण्यात आले. या कामात गावकऱ्यांचा लोकसहभाग अत्यंत मोलाचा ठरला. ग्रामस्थांनी साडेबारा लाख रुपयांचा निधी उभारून यंत्रांच्या डिझेलचा खर्च उचलला, तर ‘नाम’ने सुमारे २० ते २५ लाख रुपयांची अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. या भगीरथ प्रयत्नांमुळे गावातील पाण्याचे टँकर कायमचे बंद झाले आणि कटफळ जलसमृद्ध गाव म्हणून नावारूपास आले. कोरड्या पडलेल्या शिवारात डाळिंबाच्या बागा डोलू लागल्या आणि पशुपालनालाही मोठी गती मिळाली.

कष्टाच्या डाळिंबांची पेटी आणि नानांचे कौतुक…

काम पूर्ण झाल्यानंतरच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाला नाना कामाच्या व्यस्ततेमुळे येऊ शकले नव्हते. त्यावेळी गावकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या डाळिंबाची पहिली पेटी मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द करत ती नानांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली होती. मकरंद यांनी दुसऱ्याच दिवशी ती पेटी नानांना दिली असता, त्या डाळिंबांकडे पाहत नानांनी दुष्काळावर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिद्दीचे कौतुक केले होते, अशी आठवण पोलीस दलातील दत्तात्रय खरात यांनी जागवली.

‘कटफळ ही आमची खरी कमान’

पुढे २०१९ मध्ये कटफळच्या ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ नानांना प्रत्यक्ष भेटायला गेले होते. त्या भेटीत नाना भावुक होत म्हणाले होते की, कटफळ हे नाम फाउंडेशनचे पहिले यश आणि खरी कमान आहे. या कामामुळे शेतकरी, शेतमजूर आणि छोटे व्यापारी अशा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत फायदा पोहोचला आहे, त्यामुळे आयुष्यात एकदा तरी मला कटफळला यायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते. पण, ती त्यांची गावची भेट अपूर्णच राहिली.

दुष्काळात संकटावर फुंकर आणि सामाजिक बांधिलकी

प्रसिद्धीपासून दूर राहून ‘नाम फाउंडेशन’ने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सामाजिक बांधिलकीची अशीच भक्कम पायाभरणी केली. सन २०१५-१६ दरम्यान जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त २५० शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देत त्यांच्या पत्नींना साडी-चोळी देऊन भावाचा आधार देण्याचे काम संस्थेने केले. पंढरपूर येथील चंद्रभागा घाटाच्या बांधकामादरम्यान भिंत कोसळून अडकलेल्या दुर्घटनेतील बाधितांनाही ‘नाम’ने तत्काळ मदत पोहोचवली होती. पुढे २०१८ मध्ये खासगी सावकारांच्या जाचाला बळी पडलेल्या २१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी संस्था खंबीरपणे उभी राहिली. कटफळ पाठोपाठ माढा तालुक्यातील बेंद ओढ्याच्या खोलीकरणासाठी फाउंडेशनने मोठे पाठबळ पुरवले, ज्यामुळे परिसरातील अनेक गावे टंचाईमुक्त झाली. राज्यात जेव्हा संकटाची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा लाखो शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मनात आपुलकीचा पाझर निर्माण करणारा हा आधारवड कायम पाठीशी उभा राहिला, अशा शब्दांत ‘नाम’चे जिल्हा समन्वयक माऊली हळणवर आणि संजय पाटील-घाटणेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

‘असा आदर्श सर्वांनी घ्यावा…’

या विधायक चळवळीने अनेक तरुणांनाही समाजकार्याची प्रेरणा दिली. वेळापूर येथील तरुण कार्यकर्ते ओंकार आडत यांनी कटफळच्या कामाची माहिती संकलित करून त्यास व्यापक प्रसिद्धी दिली होती. या कामाची एकत्रित फाईल घेऊन ते जेव्हा नानांना भेटले, तेव्हा नानांनी त्यांना अत्यंत आपुलकीने जवळ घेत पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. पुढे आपल्या विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन ओंकार व त्यांची पत्नी वृषाली यांनी, ती रक्कम ‘नाम फाउंडेशन’ला मदत म्हणून सुपूर्द केली. त्यावेळी नानांनी आपले सुपुत्र मल्हार पाटेकर यांना जवळ बोलावून, समाजासाठी असा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा, असे गौरवद्गार काढले होते. कासाळगंगेच्या पात्रात साठलेला पाण्याचा प्रत्येक थेंब आणि हिरवेगार झालेले शिवार आजही या कार्याची साक्ष देत असून, नानांनी जपलेली सामाजिक बांधिलकी ग्रामस्थांच्या मनात कायम तेवत राहील.