पंढरपूर : नायक चित्रपटात ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ ही संकल्पना खूप चर्चेची झाली. आता थोडी वेगळी आणि चक्क विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक प्रयोग केला जात आहे. ‘आजचा विद्यार्थी, उद्याचा लोकप्रतिनिधी’ या संकल्पनेतून दक्षिण सोलापूर तालुक्यात एक कौतुकास्पद शैक्षणिक प्रयोग राबवला जात आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना थेट आपल्या गावचे ‘एक दिवसाचे प्रतीकात्मक सरपंच’ होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि प्रशासकीय कामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अनेक उपक्रम राबवत आहेत. असाच एक नवा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. यासाठी सुरुवातीला दक्षिण सोलापूर तालुक्याची निवड केली आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. दक्षिण सोलापुरातील अंत्रोळी, वळसंग, येळेगाव, खानापूर, आहेरवाडी, मंद्रूप आदी गावांतील विद्यार्थ्यांची निवड केली.
हा उपक्रम ४ जून रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत राबवला जाईल. या दिवशी यशस्वी विद्यार्थ्यांची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढून त्यांना सन्मानपूर्वक सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवले जाईल. त्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती देऊन मार्गदर्शन केले जाईल. बाल सरपंचांना गावातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्यांना भेटी देऊन सुधारणा सुचवण्याची मुभा असेल. त्यांनी सुचवलेल्या बाबींची नोंद ग्रामविकास अधिकारी स्वतंत्रपणे ठेवून ती गटविकास अधिकारी कार्यालयाकडे पाठवतील.
हा पूर्णपणे शैक्षणिक प्रयोग असल्याने बाल सरपंचांना कोणतेही प्रशासकीय किंवा आर्थिक अधिकार नसतील आणि त्यांचे निर्णय प्रशासनावर बंधनकारक नसतील. या दिवशी यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक व पालकांचाही सत्कार होईल. तसेच खुर्चीवरील फोटोची प्रत त्याच दिवशी विद्यार्थ्याला भेट दिली जाईल. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत.
पालक, शिक्षकांचाही होणार सन्मान
४ जून रोजी केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा आणि त्यांच्या पालकांचाही ग्रामपंचायतीतर्फे जाहीर सत्कार केला जाणार आहे. विशेष म्हणजे, सरपंच पदाच्या खुर्चीवर बसलेल्या या विद्यार्थ्यांचा छानसा फोटो काढून, त्याची एक प्रत त्याच दिवशी त्या विद्यार्थ्याला आयुष्यभराची आठवण म्हणून भेट दिली जाईल. हा उपक्रम प्रभावीपणे राबवून त्याचा संक्षिप्त अहवाल आणि छायाचित्रे पंचायत समिती कार्यालयाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या विद्यार्थ्यांना मिळणार संधी
८ वी शिष्यवृत्तीतील मुल्ला अलिया पैगंबर, महिमकर असावरी (अंत्रोळी), भैरामडगी साक्षी (वळसंग), हुक्केरी समृद्धी (येळेगाव), बौराजदार सर्वेश (खानापूर); ५ वी शिष्यवृत्तीतील हुक्केरी ओजस (येळेगांव), चव्हाण अमित (चापला वस्ती), बागवान सिमरन, शेख अहद, मकानदार सुप्रिया (आहेरवाडी) तसेच नवोदयमधील अमित चव्हाण (चापला वस्ती), रोहिणी कुंभार (मंद्रूप) व ओजस हुक्केरी (येळेगांव) या विद्यार्थ्यांना गावचा कारभार अनुभवण्याचा मान मिळेल.
