सोलापूर : श्रावणाच्या पहिल्या सरी बरसताच शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सोलापूर नगरीत धार्मिक आणि सांस्कृतिक चैतन्याचे वातावरण निर्माण होते. गुरुवार १३ ऑगस्टपासून शहरात भक्तीचा हा महाकुंभ खऱ्या अर्थाने सुरू होत असून, सिद्धेश्‍वर मंदिरासह शहराच्या पूर्व भागात भक्ती, श्रद्धा आणि भाषिक एकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

योगसमाधीला होणार आकर्षक आरास…

श्री सिद्धेश्वर मंदिरच्या सभोवताली तलाव आहे. श्रावण महिन्यानिमित्त सिद्धेश्‍वर मंदिर हे संपूर्ण शहराचे धार्मिक ऊर्जाकेंद्र असते. यंदाच्या चारही सोमवारी मंदिरातील योगसमाधीवर आकर्षक फुलांची मेघडंबरी आरास केली जाणार आहे. रोज पहाटे ५ वाजता काकड आरतीने सुरू होणारा भक्तीचा गजर रात्री उशिरापर्यंत कायम राहील. मंदिर प्रशासनाकडून दररोज सकाळी ७.३० वाजता रुद्राभिषेक, ८.३० वाजता सामूहिक महामंत्र आणि रात्री ९ वाजता प्रदक्षिणा पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. श्रावणमास निमित्ताने मंदिराव आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पूजासाहित्य विक्रीचे स्टाँल उभारण्यात आले आहेत. इतर प्राथमिक सोय-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहराच्या पूर्व भागात ७ समाजांचे रथोत्सव….

सोलापूर ही बहुभाषिकांची नगरी असून विविध समाजघटकांच्या सण-उत्सवांची मांदीयाळी असते. श्रावणमास निमितताने १७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत शहराच्या पूर्व भागात तेलुगू, कन्नड, पद्मशाली, स्वकुलसाळी, तोगटवीर, नाभिक आणि परीट या सात समाजांचे पारंपरिक रथोत्सव दिमाखात पार पडणार आहेत.

  • १७ ऑगस्ट: चिम्मटेश्‍वर रथोत्सव
  • २५ ऑगस्ट: नीलकंठेश्‍वर व जिव्हेश्वर रथोत्सव
  • २८ ऑगस्ट: मार्कंडेय रथोत्सव (या रथोत्सवात थेट चरख्यावर सूत कातून देवाला वस्त्र अर्पण करण्याची शेकडो वर्षांची परंपरा युवा पिढी जपत आहे)

दीपअमावस्या निमित्ताने आज घरोघरी होणार दीपपूजन…

दीप अमावस्य निमित्ताने बुधवारी (दि.१२) विविध मंदिरांसह, घरोघरी दीपपूजन करण्यात येईल. घरातील जुने, नवे दीप स्वच्छ करून त्यास दुध, गंगाजलनाने अभिषेक करण्यात येईल. दीपअमावस्यापासून विविध झाडांच्या पानं-फुलांच्या पत्रीचे महत्व सुरु होते. दुर्वा, आघाडा, बेल, धोतरा आदी झाडांची पानं वाहण्यात येतील. तसेच, लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. काहींच्या घरी प्रथानुसार ज्वारी, बाजरी किंवा कणिक यामध्ये गूळ घालून त्याचे दिवे करतात. तर, काहींच्या घरी मातीचे दिवे तयार करून पूजन करण्यात येते. शास्त्रानुसार दीपपूजानंतर श्रावणाला सरुवात होते, असेही धर्मशास्त्राचे अभ्यासक वेदमूर्ती ऋषीकेश दादेगावकर यांनी सांगितले.

भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर पहाटेपासून खुले

“संपूर्ण श्रावण महिनाभर सिद्धेश्‍वर मंदिरात भाविकांसाठी अभिषेक, सिद्धरामेश्‍वर पुराणाचे पारायण आणि महापूजेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सोमवारी भक्तांची होणारी गर्दी विचारात घेता, दर्शनासाठी मंदिर पहाटेपासूनच खुले ठेवले जाईल.” — आनंद हब्बू, पुजारी, सिद्धेश्‍वर मंदिर