सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे सुरू झालेल्या रेशीम कोष लिलावाच्या पहिल्याच दिवशी कोशाला प्रतिकिलो कमाल ७८० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. पहिल्याच दिवशी बाजारात २०१ किलो रेशीम कोशांची आवक झाली असून, त्यातून एकूण १ लाख ५३ हजार ८०३ रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. स्थानिक पातळीवरच हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने आणि पहिल्याच लिलावात अपेक्षित दर मिळाल्याने सोलापूरसह लगतच्या जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र शासनाचा वस्त्रोद्योग विभाग, रेशीम संचालनालय (नागपूर) आणि श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती (सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने हिरज येथे या नियंत्रित शेतमालाच्या लिलाव केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील रेशीम संचालनालयाचे सहाय्यक संचालक विठ्ठल फड होते. या लिलाव प्रक्रियेत रेशीम कोशाला प्रतिकिलो किमान ६४० रुपये, कमाल ७८० रुपये, तर सर्वसाधारण ७६५ रुपये असा समाधानकारक भाव मिळाला.
मार्गदर्शन करताना विठ्ठल फड यांनी रेशीम उत्पादनाचे तंत्रज्ञान आणि रेशीम उद्योगाचे अर्थकारणातील महत्त्व सविस्तर विशद केले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने या उद्योगाला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना थेट विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद व महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यासाठी सांगली, बारामती, कोल्हापूर (रुक्मिणी दत्त सिल्क) व मुरुड येथील प्रमुख खरेदीदार प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच धाराशिव, बाभळगाव (पंढरपूर), रिधोरे (माढा) आणि गौर (कळंब) परिसरातील रेशीम उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आपापला माल घेऊन दाखल झाले होते.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, संचालक नागना बनसोडे, प्रथमेश पाटील, केदार विभुते, गफ्फार चांदा, रेशीम संचालनालयाचे अधिकारी संदीप आगवणे, शिवानंद जोजन, शरद बावणे, महादेव गावंडे, सोलापूरचे रेशीम अधिकारी विनीत पवार आणि बाजार समितीचे सचिव अतुलसिंग रजपूत यांच्यासह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.”जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबर रेशीम उत्पादनाकडे वळाल्यास हा उत्तम शेती पूरक व्यवसाय ठरेल, त्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो.”— दिलीप माने, सभापती,श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर
