सोलापूर: मुंबई, पुणे, कोकणासह मराठवाड्यात दमदार पाऊस पडत असताना पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा मात्र अजूनही कोरडाठाक आहे. लांबलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोलापूर जिल्ह्याची पावसाची सरासरी ४८१ मिलीमीटर आहे. ७ जून ते ७ जुलैपर्यंत फक्त १२१.१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसतानाही, पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणातील पाणीपातळी वाढत असून मागील तीन दिवसांमध्ये तब्बल ८ टक्के पाणीसाठा वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केले असून, दौंड आणि बंडगार्डन येथून होणाऱ्या विसर्गात मोठी वाढ झाल्याने उजनी धरण मृतसाठ्यातून बाहेर पडण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दौंड येथून मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत १ लाख ४५ हजार ५६१ क्युसेक, तर बंडगार्डन येथून ४६ हजार ८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणाच्या दिशेने सुरू होता.

या विसर्गामुळे उजनीच्या पाणीपातळीत दर तीन तासांनी सुमारे १ टक्क्याने वाढ होत आहे. रविवारी उजनीची पाणीपातळी उणे २८.८० टक्के असणारी पाणीपातळी मंगळवारी सकाळी उणे २०.२१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तीन दिवसांमध्ये ८ टक्के पाणीपातळी वाढल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पुणे परिसरात पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर उजनी धरण लवकरच मृतसाठ्यातून बाहेर पडून जलसाठ्यात वाढ होईल, असा अंदाज धरण व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मागील वर्षी ६ जुलै रोजी उजनी धरणाची पाणीपातळी २९.०७ टक्के इतकी होती, त्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अद्याप कमी असले तरी सध्याची वाढ दिलासादायक मानली जात आहे. खडकवासला धरणातूनही विसर्ग सोडण्याचे संकेत असल्याने उजनीच्या पाणीसाठ्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. २५ जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्ताने तीन दिवस अगोदर पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी पोहचावे, यासाठी उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनातर्फे सुरु आहे.