सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या २२ व्या दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमात अधिसभा सदस्यांना बसण्यासाठी जागेची व्यवस्थित सोय केली नसल्याने सदस्यांनी थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी जमिनीवर बसून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. राज्यपालांच्या समोर घडलेल्या या प्रकारामुळे विद्यापीठ प्रशानाच्या नियोजनातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला.

विद्यापीठा पदवीप्रदान सोहळा गुरुवारी (दि. ३० जुलै) विद्यापीठाच्या प्रांगणात झाला. या कार्यक्रमास राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. पद्मभूषण प्रा. डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांना ‘डी.एस्सी.’तर पद्मश्री गिरीश यशवंत प्रभुणे यांना ‘डी.लिट.’ ही मानद पदवी राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात १६२ विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.), ५७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, तर ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी देऊन गौरविण्यात आले. सर्व मान्यवर आणि पदवीधारक सोलापूरच्या पारंपरिक ‘बाराबंदी अन् पगडी’ या पेहरावात उपस्थित होते. सोहळ्यास कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. अतुल लकडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

सुरवातीला परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डाँ. श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या आग्रभागी होते. त्यांच्या पाठीमागे राज्यपाल वर्मा यांच्यासह प्रमुख मान्यवरांसह, अधिसभा सदस्य होते. प्रमुख मान्यवर व्यासपीठावर पोहचले. त्या समोरील सभामंडपात अधिसभा सदस्यांसाठी ठेवलेल्या सोफ्यावर महापालिका, जिल्हा परिषद व महसूल विभागासह इतर काही प्रशासकीय विभागातील अधिकारी, पालक, नागरिक बसले असल्याने अधिसभा सदस्यांना बसण्यासाठी जागा नव्हती. जागा नसल्याबाबत विद्यापीठाच्या उपस्थित अधिकार्यांना अधिसभा सदस्यांनी सांगितले. पण, त्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने संतापलेल्या चार ते पाच सदस्यांनी थेट जमिनीवर बैठक मारली. कार्यक्रम सुरु होण्याची लगबग सुरु असताना सभामंडपात संतप्त सदस्यांमुळे एकच गोंधळ उडाला. अधिसभा सदस्या तथा भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनीही विद्यापीठाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक् करीत पोलिसांना सांगून अधिसभा सदस्यांना जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले. अखेर, अधिकारी व नागरिकांनी सोफा व खुर्ची रिकामी करून दिल्यानंतर सदस्य शांत झाले.

याबाबत बोलताना राज्यपालक नियुक्त अधिसभा सदस्य यतीराम होनमाने म्हणाले,विद्यापीठ प्रशासनाने जाणीवपूर्वक अधिसभा सद्यांना अवमान केला आहे. सहा महिन्यांपूर्वी सांगोला येथे झालेल्य विद्यापीठाच्या युवा महोत्सव उदघाटन प्रसंगी सदस्यांचा अवमान केला होता. वारंवार असे प्रकार होत असल्यामुळे आम्ही थेट राज्यपाल महोद्यांच्या समोर जमिनीवर बसून नाराजी व्यक्त केली, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी सुरज यादव, चन्नवीर बंकुर, वीरभद्र दंडे, संजय साळुंख, मंगेश वेदपाठक आदी अधिसभा सदस्य उपस्थित होते. याप्रसंदर्भात विद्यापीठाची बाजू जाणून घेण्यासाठी कुलगुरु प्रा. डाँ. प्रकाश महानवर यांना संपर्क केला असता महत्वाची बैठक सुरु आहे, मी थोड्या वेळाने फोन करतो, असे त्यांनी सांगितले.