सोलापूर – अनियमित पाऊस, आटत चाललेले जलस्रोत आणि भूजल पातळीतील सातत्यपूर्ण घसरण यांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनजीवन गंभीर संकटात सापडले आहे. अशा स्थितीत दुष्काळाकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून न पाहता त्याचे सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय पैलू लक्षात घेणे गरजेचे आहे. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी केवळ सरकारी अनुदाने किंवा योजनांवर अवलंबून न राहता समाजात नैतिक मूल्ये, जलसाक्षरता आणि सामूहिक शिस्त रुजवावी लागेल, असे परखड प्रतिपादन हिवरे बाजारचे सरपंच, पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलातर्फे शुक्रवारी (दि. ३०) विद्यापीठमध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
परिषदेत दुष्काळाचे बदलते वास्तव आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवर सखोल चर्चा झाली. शेतीचा वाढता उत्पादन खर्च, पाण्याची तीव्र टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न आणि उत्पन्नातील अनिश्चिततेमुळे बळीराजाचे जगणे असुरक्षित बनत चालल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता भूजल पुनर्भरण, पाण्याचा काटकसरीने वापर, स्थानिक परिस्थितीनुसार पीकपद्धतीत बदल आणि दीर्घकालीन शाश्वत उपायांची आखणी करण्यावर भर देण्यात आला.
महाराष्ट्रात आजवर दुष्काळ निवारणासाठी अनेक योजना राबवल्या गेल्या; मात्र त्यात लोकसहभाग, नैतिक अधिष्ठान आणि सामूहिक शिस्तीचा अभाव राहिल्याने वारंवार संकटाला सामोरे जावे लागत असल्याची खंत पद्मश्री पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “शेतशिवारांची शास्त्रीय पद्धतीने बांधबंदिस्ती, पावसाच्या पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन आणि पिकांचे सुयोग्य नियोजन हेच दुष्काळमुक्तीचे प्रभावी मार्ग आहेत. अहिल्यादेवी होळकरांनी ज्याप्रमाणे लोककल्याणकारी राज्यकारभारात जलनीती आणि निसर्गसंवर्धनाला अग्रक्रम दिला, तोच वारसा आज प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची गरज आहे.”
कुलगुरू डॉ. महानवर अध्यक्षीय भाषणात कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठ अहिल्यादेवींच्या वननीती व जलनीतीचा अंगीकार करत असल्याचे सांगत, नागरिकांनीही निसर्गसंवर्धनाचे सामाजिक भान ठेवण्याचे आवाहन केले. अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव जूगळे यांनी दुष्काळाचे अर्थकारण आणि शेतीवरील दुष्परिणामांवर मार्गदर्शन केले.
शासनाला सर्वसमावेशक मसुदा सादर करणार…
परिषदेत मांडण्यात आलेले अभ्यासपूर्ण विचार, तज्ज्ञांच्या शिफारशी आणि उपाययोजनांचे संकलन करून विद्यापीठातर्फे एक सर्वसमावेशक धोरणात्मक दस्तऐवज तयार करण्यात येणार असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे सुपूर्द केला जाईल, अशी माहिती संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी प्रास्ताविकात दिली. प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी परिचय करून दिला. प्रा. डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. अंबादास भासके यांनी आभार मानले. या परिषदेस कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, संशोधक, प्राध्यापक, शेतकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
