सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थीकेंद्रित नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून राज्यातील इतर विद्यापीठांसमोर आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा पुणे विभागाचे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या दिशेने वाटचाल करत गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला प्राधान्य दिल्यास देश-विदेशातील विद्यार्थी आकर्षित होतील, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूर येथील ज्येष्ठ संशोधक व साहित्यिक गोपाळराव देशमुख यांना डॉ. नितीन वाघमोडे व कुलगुरु डाँ. महानवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री प्रा. डॉ. गणपती यादव, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे उपस्थित होते. प्रा. डॉ. गणपती यादव यांनी दूरस्थ प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश खरात यांनी केले, तर जीवनगौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.
डॉ. वाघमोडे म्हणाले, सोलापूर विद्यापीठ ही ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करून देणारी संस्था आहे. कोणत्याही विद्यापीठाचा दर्जा हा तेथील प्राध्यापकांच्या गुणवत्तेवर ठरत असतो. आधुनिक सुविधा, उत्कृष्ट संशोधन आणि स्पष्ट ध्येय ठेवून विद्यापीठाने कार्य केल्यास राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. बाहेरील विद्यार्थी आकर्षित होतील, अशी शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, विद्यापीठ आता खऱ्या अर्थाने तारुण्यात प्रवेश करत असून बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन बी.टेक.चे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आयटी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळ स्थानिक स्तरावर उपलब्ध होईल. तसेच सोलापुरात आंतरराष्ट्रीय वारकरी संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.समारंभास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए. महादेव खराडे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजशेखर हिरेमठ, प्रसिद्धी प्रमुख डॉ. मलिक रोकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध श्रेणीतील उत्कृष्ट पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
जीवनगौरव पुरस्काराने संशोधन प्रवासाचे सार्थक : गोपाळराव देशमुख
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ संशोधक व साहित्यिक गोपाळराव देशमुख यांच्या वतीने त्यांची कन्या कौशल्या देशमुख यांनी मनोगत वाचून दाखविले. त्या म्हणाल्या, “सोलापूर विद्यापीठाकडून मिळालेला जीवनगौरव पुरस्कार हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. या सन्मानामुळे अनेक दशकांच्या संशोधन, लेखन आणि समाजकार्याच्या प्रवासाचे सार्थक झाले आहे. हा पुरस्कार केवळ माझा नसून संशोधनात साथ देणाऱ्या सहकाऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा आणि ज्ञानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. सोलापूर विद्यापीठ हे मानव विकासाचे केंद्र असून येथील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. या सन्मानामुळे पुढील वाटचालीस नवी प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाला आहे.”
विविध पुरस्कारांचे वितरण :
- उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार : वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर.
- उत्कृष्ट प्राचार्य : प्राचार्य डॉ. सत्यजीत शहा (हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर)
- उत्कृष्ट शिक्षक (विद्यापीठ) : डॉ. प्रभाकर कोळेकर
- उत्कृष्ट शिक्षक (महाविद्यालय) : प्रा. डॉ. बापू राऊत (वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर)
- उत्कृष्ट शिक्षकेत्तर अधिकारी (वर्ग १ व २) : नशीर देशमुख
- उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी (वर्ग ३) : ज्ञानेश्वर निंबाळकर
- उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी (वर्ग ४) : शिवराज मिटकरी
- उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी (लिपिक संवर्ग – महाविद्यालय) : अशोक कोरे (सी.बी. खेडगीज सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स अँड राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट)
- उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी (चतुर्थश्रेणी – महाविद्यालय) : विष्णु वाघमारे (वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर)
