सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवास सोमवारपासून (२८ सप्टेंबर) बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी महाविद्यालयात उत्साहात प्रारंभ होत आहे. १ ऑक्टोबर चालणाऱ्या या कलामहोत्सवात संलग्नित महाविद्यालयांतील सुमारे दोन हजार कलावंत विद्यार्थी ३९ विविध कलाप्रकारांत आपले कौशल्य सादर करणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी दिली.

सोमवारी महोत्सवाचे उद्घाटन सकाळी १० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून, संयोजन समितीचे अध्यक्ष तथा कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या सोहळ्यास खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार दिलीप सोपल, आमदार राजेंद्र राऊत तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष व संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयाच्या प्रांगणात कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मुख्य रंगमंचासह एकूण सहा स्वतंत्र रंगमंचांवर या स्पर्धा रंगणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी वॉटरप्रूफ मंडप, दर्जेदार ध्वनी-प्रकाशयोजना, आसनव्यवस्था तसेच भोजन व निवासाचे नियोजन करण्यात आले आहे. नियमावलीनुसार सहभागासाठी ‘लॉट्स’ निश्चित केले असून दिलेल्या वेळेतच सादरीकरण करण्याचे सूचना संघ व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.

मागील नाराजीनाट्यातून धडा; मंचावरील बैठक व्यवस्थेत बदल

गेल्यावर्षी सांगोला येथील युवा महोत्सव आणि विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात मंचावरील बैठक व्यवस्थेवरून वाद होऊन व्यवस्थापन परिषद सदस्य नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा विद्यापीठ प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. उद्घाटनावेळी मुख्य मंचावरील पहिल्या रांगेत प्रमुख पाहुणे व वक्ते, तर मागील रांगेत व्यवस्थापन परिषद सदस्यांची बैठक व्यवस्था असेल. मात्र, मंचावर बसू इच्छिणाऱ्या व्यवस्थापन सदस्यांनी पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सिनेट सदस्यांची सोय मंचासमोरील व्हीआयपी रांगेत करण्यात आली आहे.

रंगमंच अन् त्यावर होणारे सादरीकरण…

-रंगमंच १ – ‘कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मुख्य रंगमंच’ येथे उद्घाटन समारंभ, लावणी, एकांकिका, शास्त्रीय नृत्य, लोक वाद्यवृंद, नकला, प्रश्नमंजुषा, प्रहसन, लोकनृत्य, पारितोषिक वितरण
-समारंभ रंगमंच २ – ‘अण्णा भाऊ साठे संगीत मंच’ येथे भारतीय समूहगायन, शास्त्रीय सूरवाद्य, शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य
-रंगमंच ३ – ‘संत तुकाराम ललित मंच’ येथे कातरकाम, भित्तीचित्रण, मेहंदी, व्यंगचित्र, मातीकाम, रांगोळी,
-रंगमंच ४ – ‘शाहीर अमर शेख लोककला मंच’ येथे मूक अभिनय, भारुड, भजन, जलसा, पोवाडा, कव्वाली, समूहगायन पाश्चात्य, पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य वादन
रंगमंच ५ _ ‘ क्रांतिसिंह नाना पाटील वाड्.मय मंच’ येथे प्रश्नमंजुषा लेखी, वक्तृत्व मराठी, काव्यवाचन, वक्तृत्व इंग्रजी, कथाकथन, वक्तृत्व हिंदी, वादविवाद
रंगमंच ६ – ‘महाविद्यालय परिसर’ येथे पथनाट्य, स्थळचित्रण, स्थळ छायाचित्रण, निर्मिती चित्र, शोभायात्रा

पहिल्या दिवसाचे वेळापत्रक व कलाप्रकार :

सकाळी ८ ते १० नोंदणी व १० ते १२ दरम्यान उद्घाटन सोहळा पार पडेल. दुपारी १२.१५ वाजता संघ व्यवस्थापकांची बैठक झाल्यानंतर स्पर्धांना प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी दुपारी १ ते सायं. ४ दरम्यान मुख्य रंगमंचावर लावणी व मूक अभिनय रंगणार आहे. याशिवाय दुपारी १ ते ३.३० कातरकाम, दुपारी १ ते २ प्रश्नमंजूषा (लेखी), दुपारी १ ते रात्री १० भारतीय समूहगायन, दुपारी २ ते ५ मराठी वक्तृत्व, दुपारी ४ ते ७ भारुड आणि दुपारी ४ ते ६.३० या वेळेत भित्तिचित्रण स्पर्धा होईल. सायंकाळच्या सत्रात ५ ते रात्री १० काव्यवाचन, ६ ते १० एकांकिका, ७ ते ९.३० मेहंदी, तर रात्री ७ ते १० या वेळेत भजन स्पर्धा रंगणार आहे.