पंढरपूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी गुलदस्त्यात ठेवली आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६१६ मतदार आहेत. यापैकी ३०७ मतदार हे भाजपचे तर महायुतीचे चारशेहून अधिक संख्याबळ आहे. तर दुसरीकडे विरोधकांचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपतर्फे अनेक इच्छुक असून, माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत यांचे नाव चर्चेत आहेत. मात्र उमेदवारीबाबत भाजप धक्कातंत्र वापरणार का, हे पाहावे लागणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजप स्वबळावर आणि पक्षाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढली. या सर्व निवडणुकीसाठी भाजपतर्फे निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. तर विरोधकांना उमेदवारी देताना शोधाशोध करावी लागल्याचे चित्र होते. या सर्व निवडणुकीत विरोधी पक्ष पूर्णपणे निष्प्रभ ठरला. भाजपविरोधात शिवसेना (शिंदे ) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ( अजित पवार ) या महायुतीच्या पक्षातच मैत्रिपूर्ण लढत झाली.

नगर पालिका, सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. विशेष म्हणजे एकेकाळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आणि लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपविरोधात गेलेल्या असताना भाजपने निवडणुकीत मोठे यश मिळवले.

जिल्ह्यात भाजपच्या यशाचे शिल्पकार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आहे. निवडणुकीत उमेदवारी निवडीपासून ते प्रचाराची सांगता करण्यापर्यंत गोरे यांनी दिवसाची रात्र केली. स्थानिक पदाधिकारी आणि पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यांचा समन्वय गोरे यांनी साधला. तर, दुसरीकडे भाजपच्या या झंझावातापुढे विरोधी पक्ष पूर्णपणे निष्प्रभ ठरले.

सोलापूर जिल्ह्याचे राजकारण ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आणि मोहिते पाटील यांच्याभोवती फिरणारे होते. अगदी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे, तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत धक्कादायक विजय मिळवला होता. असे असताना पालकमंत्री गोरे यांनी पक्षाची मोट बांधली. विकास हे उद्दिष्ट ठेवले. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले.

या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण ६१६ मतदार आहेत. त्यांपैकी भाजपचे ३०७, तर महायुतीचे चारशेहून अधिक संख्याबळ आहे. तर गेल्या वेळी ही निवडणूक प्रशांत परिचारक यांनी भाजपपुरस्कृत अपक्ष लढले होते आणि विजयी झाले. त्यामुळे या निवडणुकीत ते दावेदार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री बावनकुळे, पालकमंत्री यांच्यासह भाजप वरिष्ठ नेत्यांचे संबंध परिचारक यांच्याशी चांगले आहेत, तर बार्शीचे राजेंद्र राऊत यांनी नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली होती. तेदेखील मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या गुड बुकमधील आहेत. असे असताना भाजप धक्कातंत्र वापरून कदाचित महिला उमेदवार किंवा अन्य पर्याय निवडणार का याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.

बिनविरोध करा : पालकमंत्री गोरे

या निवडणुकीत भाजपकडे आणि महायुतीकडे मोठे संख्याबळ आहे, तर विरोधकांकडे संख्याबळ अत्यल्प आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करून इतिहास घडवावा आणि प्रशासनावरील ताण कमी करावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.