सोलापूर : राजकारणातील शह-काटशह आणि दशकभराचा टोकदार विखार तात्पुरता बाजूला ठेवत, अकलूजच्या मोहिते-पाटलांनी थेट कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या निमगावच्या शिंदे यांची आपुलकीने भेट घेतील. अमेरिकेतील क्लिष्ट हृदयप्रत्यारोपणानंतर मायदेशी परतलेले माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांची प्रकृती विचारण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांचे सुपूत्र माजी आमदार रणजितसिंह यांच्यासह बुधवारी निमगाव गाठले. वरकरणी ही केवळ एका आजारी नेत्याची घेतलेली आस्थेवाईक विचारपूस दिसत असली, तरी जिल्ह्यातील सत्तेचे सारीपाट उलथवून टाकणाऱ्या या दोन घराण्यांमधील अनपेक्षित गळाभेटीने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मात्र कुजबुज निर्माण केली आहे.
माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर अमेरिकेत हृदयप्रत्यारोपणाची अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया झाली होती. तब्बल दीड वर्षाच्या उपचारानंतर ते नुकतेच मायदेशी परतले असून १ सप्टेंबर रोजी त्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार पार पडला होता. त्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी मोहिते-पाटील पिता-पुत्र निमगावातील शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दोन्ही नेत्यांनी अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कधीकाळी ज्येष्ठ नेते माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या छत्राखाली एकत्र काम करणाऱ्या या दोन्ही घराण्यांतील राजकीय सख्य २०१२ नंतर संपुष्टात येऊन टोकाचा संघर्ष सुरू झाला होता. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि दूध संघावरील वर्चस्वाच्या लढाईत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मोहिते-पाटलांना सत्तेतून बाजूला ठेवण्यासाठी भाजप व समविचारी गटाशी हातमिळवणी करत थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खेचून आणले होते. तेथून सुरू झालेला हा संघर्ष सन २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अधिक तीव्र झाला. करमाळ्यात संजयमामा शिंदे आणि माढ्यात बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांचा पराभव करण्यात मोहिते-पाटलांच्या रणनीतीने निर्णायक भूमिका बजावली होती. एका बाजूला सत्तेच्या संघर्षात शिंदे घराण्याला मोठा धक्का बसलेला असताना, दुसरीकडे मोहिते-पाटलांनी थेट त्यांच्या घरी जाऊन आपुलकीने केलेली प्रकृतीची चौकशी ही, राजकीय निरीक्षकांना चकित करणारी ठरली आहे. ‘या भेटीत कोणताही राजकीय संदर्भ नसून केवळ माणुसकीच्या नात्याने घेतलेली ही भेट होती,’ असा दावा दोन्ही बाजूंनी केला जात असला, तरी राजकारणात कायमचे वैर नसते हे वारंवार सिद्ध झाले आहे.
मंगळवारी पिंपळनेर येथे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघासह, जिल्ह्यातील भाजपची अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. त्यामुळेच, आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट म्हणजे केवळ तब्येतीची विचारपूस ठरते की नव्या सत्ता समीकरणांची पायाभरणी होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे डोळे लागले आहेत.
