पंढरपूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. जिल्ह्यात ६८ जागा जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात भाजपविरोधात इतर सर्व पक्ष, स्थानिक आघाडी असे सर्वसाधारण चित्र आहे. या निवडणुकीत माळशिरस, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ या ठिकाणी चुरशीची आणि अस्तित्वाची लढाई होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्थानिक नेत्यांसह जिल्हा पिंजून काढला. भाजपने विकासासोबत विरोधकांचा चांगला समाचार घेत प्रचार केला. तर सर्व पक्षांनी भाजपवर सडकून टीका केली. या प्रचाराची सांगता झाली.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील प्रचाराचा सोपस्कार पूर्ण झाला. जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी २७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४८५ उमेदवार नशीब आजमाविणार आहेत. या निवडणुकीत भाजप – ६०, शिवसेना (शिंदे) -२६, राष्ट्रवादी(अजित पवार)–२८, शिवसेना(ठाकरे) – ९, राष्ट्रवादी (शरद पवार) २१ आणि कॉंग्रेस –२२ तर अपक्ष ६ जागांवर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजप दोन ठिकाणी वगळता स्वबळावर निवडणूक लढवत आहे. तर, काही ठिकाणी दोन राष्ट्रवादी, दोन सेना एकत्र, तर दोन राष्ट्रवादी एकत्र अशी लढत होत आहे. स्थानिक आमदार, माजी आमदार यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. दरम्यान, अजित पवारांचे अकाली निधन झाले. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचार सभा न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत उमेदवारी निवडीपासून ते प्रचारसभेपर्यंत जिल्हा पिंजून काढला.
या निवडणुकीत माळशिरस येथे मोहिते पाटील, आमदार जानकर विरुद्ध माजी आमदार राम सातपुते अशी तुल्यबळ लढत होत आहे. यात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन उत्तम जानकर यांच्यात लढत होत आहे. आमदार जानकर यांच्यामुलासह पत्नीदेखील निवडणूक लढवीत आहेत. तसेच ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी पालकमंत्री गोरे, सातपुते यांच्यावर विरोधकांनी सडकून टीका केली, तर पालकमंत्री यांनीदेखील मोहिते पाटील, जानकर यांच्यावर बोचरी टीका केली. असेच चित्र मोहोळ तालुक्यात आहे. या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात दोन राष्ट्रवादी आणि सेना असे चित्र आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेश पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार राजू खरे यांनी भाजप आणि राजन पाटील यांच्यावर आरोप, टीका करत प्रचार केला. एकंदरीत नगरपालिका, त्यानंतर महापालिका निवडणुकीत पालकमंत्री गोरे यांनी भाजप स्वबळावर निवडणूक लढली आणि घवघवीत यश मिळाले. आता मिनी मंत्रालयाचा कारभार कोणाकडे मतदार सोपविणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

