सोलापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या धोकादायक वर्गखोल्या, प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारतींचा अभाव, निकृष्ट गणवेश पुरवठा आणि अपूर्ण बांधकामे यावरून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील शाळेच्या छताचा गिलावा साडीच्या झोक्यामुळे पडल्याचा प्रशासनाचा दावा सदस्यांनी फेटाळून लावत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना निरुत्तर केले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, शिक्षण सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी सभापती रामप्पा चिवडशेट्टी व मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीपासूनच शिक्षण, आरोग्य विभागाच्या कारभारावरून सदस्यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. सलगर गटाचे सदस्य शिवराज म्हेत्रे यांनी बबलाद शाळा दुर्घटनेचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी दुरुस्ती झालेल्या इमारतीबाबत प्रशासनाने चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला. साडीचा झोका बांधल्यामुळे छत पडल्याची खोटी माहिती देऊन दोषी ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा करत, १ कोटी ८२ लाखांचा निधी शिल्लक असतानाही दुरुस्ती का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. यावर सर्वच खातेप्रमुख निरुत्तर झाले.
इतर सदस्यांनीही प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढले. सांगोल्याचे दादा लवटे यांनी बचत गटांकडून खरेदी न करता विद्यार्थ्यांना निकृष्ट गणवेश वाटून आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप केला. कुंभारीच्या श्रृती भोरगुंडे यांनी शाळांची दुरवस्था आणि मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याकडे लक्ष वेधले. तर, संभाजी ढाणे यांनी माढा तालुक्यातील कूर्डू येथे इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना शेळ्यांच्या गोठ्यात बसावे लागत असल्याची गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या गोंधळानंतर शिक्षण सभापती केदार-सावंत यांनी तीन आठवड्यांत शाळांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून नवीन वर्गखोल्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

आरोग्य केंद्रातील सोयी-सुविधांसह, उपकेंद्र मंजूरीच्या प्रस्तावाबाबत मागील बैठकीत चर्चा झाली होती. अधिकार्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. पण, त्याची दखल घेण्यात येत नसून सदस्य बैठकीला फक्त हजेरी लावलायला अन् चहा पाणी करण्यासाठी येतात, असे प्रशासनाला वाटते काय, अशा शब्दात सदस्या शनुमुखी कोरके, सविता उंबरजे यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, सभागृहाच्या नामांतरावरून अर्जुनसिंह मोहिते-पाटील आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्यात शाब्दिक संघर्ष झाला. भारतरत्ना अटलबिहारी वाजपेयींच्या नावाला विरोध नसून नवीन इमारतीला ते नाव द्यावे, पण, नियमबाह्य नामांतर करून राजकीय मतभेद वाढवू नयेत, अशी विनंती मोहिते-पाटील यांनी केली. तर, त्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन घेऊन पुढील प्रक्रीया होईल, असे सीईओ जैन यांनी सांगितले.
तसेच, माळशिरसच्या पुरंदावडे येथे रेल्वेच्या प्रस्तावित जागेत ८५ लाखांची पाण्याची टाकी बांधल्याप्रकरणी ठेकेदारावर कारवाईची मागणी सभापती संस्कृती सातपुते यांनी केली; तर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मोहिते-पाटील यांनी केल्याने या मुद्द्यावरूनही दोन्ही नेत्यांत शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला.
