सोलापूर । सोलापूर जिल्हा परिषदेवर तब्बल चार दशकांपेक्षा जास्त काळ अबाधित राहिलेले मोहिते-पाटील गटाचे राजकीय वर्चस्व मोडून काढल्यानंतर, आता भाजप प्रशासकीय स्तरावरही या घराण्याची प्रतीके पुसण्याच्या मोहिमेवर उतरला आहे. जिल्हा परिषदेतील ऐतिहासिक आणि राजकीय ओळख असलेल्या ‘शिवरत्न’ मुख्य सभागृहाचे नाव बदलून, त्याला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा निर्णय  स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात नवा संघर्ष तापण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ६८ पैकी ३९ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले.  या निवडणुकीत गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते-पाटील असा थेट सामना रंगला होता. विजय मिळवल्यानंतर केवळ सत्तेवर समाधान न मानता, मोहिते-पाटील यांचे जिल्हा परिषदेतील वर्चस्व आणि ऐतिहासिक स्मृती पुसून टाकण्याचा राजकीय संदेश भाजपने या नामांतराच्या माध्यमातून दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सभागृहाचे नाव बदलून अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला समितीने एकमताने मंजुरी दिली.

शासकीय व निमशासकीय कार्यालयांना नावं देण्यासाठी सन २००२ मध्ये शासन निर्णय आहे. त्यामध्ये ठरवून दिलेल्या २४ महापुरुष व नेत्यांच्या नावांपैकी एक नाव देणे,छायाचित्र लावणे बंधनकारक आहे. त्यामध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा समावेश आहे, त्यामुळे बैठकीत तो निर्णय झाल्याचे पदाधिकारी, सदस्यांकडून सांगण्यात येत आहे.

‘शिवरत्न’ नावाचा राजकीय आणि भावनिक संदर्भ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे वडील (कै.) शंकरराव मोहिते-पाटील आणि मातोश्री (कै.) रतनप्रभादेवी यांच्या नावातील आद्यक्षरे एकत्र करून ‘शिवरत्न’ या नावाची निर्मिती झाली होती. अकलूज येथील मोहिते-पाटील यांचे निवासस्थान, शिक्षण संस्था आणि सहकारी संस्थांनाही हेच नाव आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे तात्कालीन अध्यक्ष (स्व.) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी तिसर्या मजल्यावरील या सभागृहाचे नामांतर ‘शिवरत्न’ असे केले होते.

सत्तेचा नवा अध्याय?

सोलापूरच्या राजकारणात ‘शिवरत्न’ या शब्दाला अनन्यसाधारण राजकीय आणि भावनिक महत्त्व राहिले आहे. सत्ता हाती आल्यानंतर मोहिते-पाटील गटाची जुनी ओळख पुसून भाजपने मिनी मंत्रालयावर स्वतःच्या सत्तेची नाममुद्रा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. या नामांतरामुळे भाजप आणि मोहिते-पाटील गटातील राजकीय संघर्ष येत्या दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. -भारतत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण जिल्हा परिषदेत येणार्यांना व्हावी. त्यांच्या नावाला कोणाचा विरओध असण्याचे कारण नसल्याने हा ठराव झाला असून निर्णय स्थायी समितीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. –इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सोलापूर