लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटनासाठी सर्व काही असले तरी ठोस धोरणाचा अभाव जाणवतो. त्यामुळे ‘चालेल तसे चालेल’ अशा पद्धतीने जिल्ह्याचा पर्यटन विकास सुरू आहे, असे परखड मत व्यक्त करण्यात आले.

भारतीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्रामध्ये या क्षेत्रातील अभ्यासकांनी आपले विचार मांडले. पर्यटन सल्लागार वसिम सरकावस आणि हॉटेल व्यावसायिक सचिन शानबाग यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला. पर्यटन अभ्यासक समीर देशपांडे यांनी कोल्हापूरात पर्यटनविषयक भव्य काही उभारण्याऐवजी मोठमोठ्या घोषणांचा आढावा घेतला.

आणखी वाचा-मराठा आरक्षणाबाबतची संभ्रमावस्था शासनाने दूर करणे गरजेचे – सतेज पाटील

वसिम सरकावस म्हणाले, पर्यटन व्यवसाय आणि त्यातील वाढ ही समाजातील सर्व घटकांची जबाबदारी आहे. सचिन शानबाग म्हणाले, जिल्हा दर्शनासाठी एक दिवसीय सहल आयोजित केल्यास चांगला प्रतिसाद मिळू शकेल. डॉ. किमया शहा, सिध्दगिरी मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, ‘सायबर’चे डॉ. दीपक भोसले, किर्लोस्करचे शरद आजगेकर,मयुरी आळवेकर आदींनी भूमिका मांडली. यानंतर सर्वांनी जिल्हाधिकार राहूल रेखावार यांची भेट घेतली.

पर्यटन समिती स्थापन करावी

शासकीय पातळीवर पर्यटन समिती असते. याच कामासाठी पूरक म्हणून हॉटेल व्यावसायिक, वाहतूकदार, गाईड, पर्यटन अभ्यासक, दुर्गभ्रंमतीकार आदींची जिल्हा पर्यटन समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली.