कोल्हापूर : कोल्हापूरची गौरवशाली क्रीडा परंपरा आहे. ती अधिक विकसित करण्यासाठी भविष्यात लवकरच गाव तिथे क्रीडांगण ही योजना राबवणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. नुकत्याच जपान येथे पार पडलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात रौप्य पदक पटकावलेल्या कोल्हापूरची कन्या सोनम मस्कर यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाहूजी सभागृहात पुष्पगुच्छ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले , सोनमच्या कारकिर्दीत कुटुंबीयांचा मोठा त्याग आहे. मस्कर कुटुंबियांनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला. क्रीडा विकासासाठी शासकीय नियमात आवश्यक त्या ठिकाणी बदल करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोनम हिचे दूरध्वनीवरून अभिनंदन करताना आपल्याकडून सर्वतोपरी सहाय्य करू अशा शब्दात आश्वस्त केले.

वर्ग दोनवर नियुक्ती

सत्काराला उत्तर देताना सोनम मस्कर हिने भविष्यातही आपल्याकडून कामगिरीमध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. प्रास्ताविक उपसंचालक सुहास पाटील यांनी केले. सोनम यांच्या या कामगिरी नुसार ते थेट क्रीडा कोट्यातून वर्ग दोनच्या अधिकारी पदावर नियुक्त होऊ शकतात, असे सांगितले.

यावेळी आर . डी पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेते , क्रिकेट असोसिएशनचे बाळ पाटणकर, वसंत पाटील अधीक्षक , स्नेहल पाटील क्रीडा अधिकारी , मेहुल केनिया राज्य क्रीडा मार्गदर्शक , सुधाकर जमादार तालुका क्रीडा अधिकारी – राधानगरी , आंतरराष्ट्रीय योगपट्टू रोहित चव्हाण ,रमेश कुसाळे , प्रशिक्षक राधिका बराले , रोहित हवालदार, राष्ट्रीय नेमबाज अब्दुल हमीद मिरशिकारी, जितू विभुते , इंद्रजीत मोहिते तसेच वडील उत्तम मस्कर व आई सुमन मस्कर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व क्रीडाप्रेमी उपस्थित होते .

आबिटकर म्हणाले, सोनमच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे तिच्या घरी जात आई-वडिलांचा भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्याचा योग आला होता. आज तिचा गौरव करताना तिच्या यशाचे खरे शिल्पकार असलेले आई-वडिल आणि प्रशिक्षकांनी केलेले मार्गदर्शन यांचेही मनापासून कौतुक वाटते. सोनमचे हे यश केवळ एका पदकापुरते मर्यादित नाही, तर येणाऱ्या नव्या पिढीतील असंख्य मुला-मुलींना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा देणारे आहे. सोनम ही नव्या पिढीची आदर्श आहे, आणि तिच्या यशातून अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळणार हे निश्चित.कोल्हापूर हे क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख ताऱ्यांची भूमी आहे, आज यांची जाणीव पुन्हा एकदा सोनमने करून दिली. सोनमसारखे अनेक पदकवीर कोल्हापूरच्या मातीतून घडावेत आणि देशाच्या तिरंग्याची शान जगभर उंचावावी, यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य आम्ही करू.

याप्रसंगी सोनमचे वडील. उत्तम मस्कर, आई सुमन मस्कर, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, शिवछत्रपती पुरस्कारार्थी प्रशिक्षक राधिका बराले, शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर. डी. पाटील, क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. बाळ पाटणकर, वेद फौंडेशनचे अध्यक्ष रुद्र पाटील, वेद शूटिंग अकॅडमीचे जितेंद्र विभुते, क्रीडा प्रतिष्ठानचे विजय मळगे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी रमेश कुसाळे, रोहित हवालदार, आंतरराष्ट्रीय खेळाडू इंद्रजीत मोहिते, रोहित पाटील, समीर मुल्लानी, तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, सागर शिंदे, राजेंद्र पाटील, सोनमचे कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होते.