कोल्हापूर : राजधानी नवी दिल्लीत गेल्या १८ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला बुधवारी कोल्हापुरातून पाठिंबा देण्यात आला आहे. पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा इंडिया आघाडीच्या (महाविकास आघाडी) वतीने केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी जमलेल्या आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करत परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला. तसेच २० जुलैला दिल्लीमध्ये जंतर मंतर पासून संसद भवनावर निघणाऱ्या भव्य मोर्चाला पाठिंबाही देण्यात आला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
देशातील ‘नीट’ आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा, ही आंदोलनाची प्रमुख मागणी होती. याच मागणीसाठी सोनम वांगचुक जंतर-मंतर मैदानावर उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला आज कोल्हापुरातून पाठिंबा देण्यात आला.
आंदोलकांनी हातात फलक घेऊन आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला. यावेळी बोलताना ठाकरेसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले की, ” नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे सरकार देशाला लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे घेऊन जात आहे. पेपरफुटीमुळे तरुणांच्या मेहनतीवर पाणी फिरवले जात असून सरकार कोणतीही दखल घ्यायला तयार नाही, असा आरोप त्यांनी केला.
निषेध आंदोलना उदय नारकर, भरत रसाळे, डी. जी. भास्कर, सुभाष देसाई, शुभम शिरहट्टी यांसारख्या अनेक नेत्यांनी आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
‘संसद मार्च’ला पाठिंबा
येत्या २० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना जंतर-मंतर ते संसद भवन असा भव्य शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापुरातील आंदोलकांनी याला पाठिंबा दर्शवला असून, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि बळी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
चर्चेतील व्यक्तिमत्व
सोनम वांगचुक हे लडाखमधील प्रसिद्ध अभियंता, शिक्षण सुधारक आणि हवामान कार्यकर्ते आहेत. ‘थ्री इडियट्स’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘फुन्सुक वांगडू’ हे पात्र त्यांच्याच जीवनापासून प्रेरित होते.लडाखमधील शैक्षणिक सुधारणा आणि सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या इमारतींच्या डिझाईनसाठी ते ओळखले जातात. त्यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
सोनम वांगचुक सध्या दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणावर बसले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि लडाखला घटनेच्या सहाव्या सूचीत समाविष्ट करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असून, त्यांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
