कोल्हापूर : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे वैद्यकीय क्षेत्र पुन्हा चर्चेत आले आहे. या विद्यार्थ्यांचे भवितव्य पाहता सरकारला विशेष धोरण तयार करावे लागेल, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के यांनी शनिवारी व्यक्त केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा दहावा दीक्षान्त समारंभ शनिवारी येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू शिर्के म्हणाले,की रशिया व युक्रेनमधील संघर्षांमुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी भारतात परतत आहेत. या घटनेनंतर त्यांच्या उर्वरित शिक्षणाचे पुढे काय, वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना इतक्या लांब का जावे लागते, हे दोन प्रश्न निर्माण झाले असून त्यासाठी विशेष धोरण तयार करावे लागेल. त्यापेक्षाही वैद्यकीय क्षेत्रातील शैक्षणिक संधींचा विस्तार केला पाहिजे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना डी.लिट. तर ख्यातनाम वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांना डी.एस्सी. उपाधीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी मनोगत व्यक्त केले. ३६१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित करण्यात आले. ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले तर डॉ. धनाजी मालवेकर यांना विशेष संशोधक म्हणून सन्मानित केले.
अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. संजय डी. पाटील होते. त्यांनी आगामी प्रकल्पांची माहिती दिली. व्यवस्थापन समिती सदस्य आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र- कुलगुरू डॉ. शिल्पा शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले उपस्थित होते.