कोल्हापूर : संभाव्य महापुराला सामोरे जाताना राज्य शासनाच्या उपाययोजना तोकडय़ा आहेत,असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केला. याकरिता महापुराच्या उपाययोजना संदर्भात राज्य शासनाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली. गतवर्षी आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांना अपुरी मदत मिळाली असल्याच्या मुद्दय़ावरून भाजपने आज मोर्चा काढला. पूरग्रस्तांना सोबत घेऊन दसरा चौकातून निघालेला टाहो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, तेव्हा कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या वेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासनावर निशाणा साधला. ते म्हणाले २०१९ साली महापूर आला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक क्षेत्राला मदत करण्याची भूमिका घेतली. मी स्वत: महापुरात उभे राहून ४२ प्रकारचे शासन आदेश निर्गमित केले. त्यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला. परिणामी राजू शेट्टी यांच्यासह सर्वानी २०१९ प्रमाणे पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे. परंतु राज्य सरकारचे नाक, कान, डोळे बंद आहेत. गतवर्षी महापूर आल्यावर महा विकास आघाडी सरकारने केलेली मदत अपुरी आहे. आता केंद्र सरकारने राज्य शासनाला १४ हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यातून पूरग्रस्तांना कोणती मदत केली जाणार याची घोषणा करावी. महापुरावेळी संस्थांचे कार्यकर्त्यांनी मदत कार्य करायचे आणि पालकमंत्री झोपायला रिकामे असा प्रकार चालणार नाही, अशी टीकाही त्यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता केली.