कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येला राज्य शासन जबाबदार आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी केला. आणखी किती शेतकऱ्यांचे मुडदे पाडून हे शासन कारभार करणार आहे, असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

गेवराई तालुक्यातील नामदेव जाधव या ३५ वर्षीय ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. त्यांच्या शेतातील दोन एकर ऊस साखर कारखान्यांने गळितास नेला नाही. त्यासाठी पैशाची मागणी केली जात होती. त्यातून आलेल्या नैराश्याने जाधव यांनी आत्महत्या केली. यांच्या या आत्महत्येला जबाबदार असणारे अधिकारी, मुकादम, ऊसतोडणी मशीन चालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.

शेट्टी पुढे म्हणाले,की वास्तविक मराठवाडय़ामध्ये यंदा अतिरिक्त ऊस आहे याची शासनाला कल्पना होती. पाणी टंचाई निर्माण झाली, की विहिरी ताब्यात घेऊन त्यातील पाणी शासन उपसा करीत असते. या प्रमाणे साखर कारखाने बंद झाले आहेत अशा सक्षम साखर कारखान्यांकडे अतिरिक्त ऊस गाळपासाठी दिला असता तर अतिरिक्त उसाची समस्या निर्माण झाली नसती. त्यातून जाधवसारख्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. या आत्महत्येस राज्य शासन जबाबदार आहे.