कोल्हापूर : पहिल्या टप्य्यात पुण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. तिला मिळणारा प्रतिसाद पाहून ती मुंबईपर्यंत नेण्यात येईल. याचे दर कमी करण्यासंदर्भात तसेच कोल्हापूर मिरज दुहेरीकरणाचे काम सुरू करण्याबाबत सकारात्मक आहे, असे मत रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी सोमवारी या सेवेच्या प्रारंभप्रसंगी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून ऑनलाइन प्रारंभ केला.

सोमन्ना म्हणाले, कोल्हापूर ते मिरज दुहेरीकरण झाले नसल्याने कोल्हापुरातून नवीन रेल्वे सुरू करण्यात अडचण येत असल्याने याचाही विचार केला जाईल. आज कोल्हापूर-पुणे वंदे भारत सह आणखीन तीन वंदे भारतचे उद्घाटन होत असून ही मोदींची महाराष्ट्रासाठी भेट आहे.खासदार शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूर वैभववाडी मार्गाचे काम थांबले आहे ते काम सुरू व्हावे. कोल्हापूर – मुंबई वंदे भारत, कोल्हापूर – बेंगलोर ही सेवा सुरू करावी.

हेही वाचा >>>केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी कागदावर! निधीच्या केवळ घोषणाच, चौकशी समितीकडून यंत्रणाही दोषमुक्त

खासदार धनंजय महाडिक म्हणाले कोल्हापूरकरांकडून अनेक दिवसांपासून वंदे भारतची मागणी आज अंशतः पूर्ण होत आहे. या सेवेचा लाभ सर्वसामान्य प्रवाशांना होण्यासाठी हे दर कमी करावेत. खासदार धैर्यशील माने, रेल्वेचे विशेष प्रबंधक प्रभात रंजन, पुणे विभागाचे अधिकारी रामदास भिसे, शिवनाथ बियाणी, भाजपचे राहुल चिकोडे, विजय जाधव, सत्यजित कदम, किरण नकाते, राजसिंह शेळके उपस्थित होते.