कोल्हापूर : राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप भाजपाकडे आलेला नाही. महाविकास आघाडीकडून सुयोग्य प्रस्ताव आल्यास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले.

विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, अशा प्रकारची कोणतीही चर्चा सुरू असेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याची माहिती प्रथम माझ्याकडे आली असती. पण अद्याप असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. राज्यातील सहापैकी कोल्हापूरसह पाच जागा भाजपा जिंकेल अशी अवस्था आहे.

यापूर्वी राजीव सातव, शरद रणपिसे निधनानंतर झालेल्या रिक्त जागेच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजपाने सहकार्य केले आहे, असा दाखला देऊन निवडणूक बिनविरोध होण्यासारखा प्रस्ताव असेल तर त्याचे भाजपा स्वागतच करेल. निवडणुका होऊन त्यावर वेळ आणि पैसा खर्च व्हावा, अशी भाजपाची वृत्ती नाही. भाजपा स्वतःहून कोणताही प्रस्ताव देणार नाही. उद्या मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर २६ नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची आघाडीची इच्छा असेल तर त्यांनी लवकर निर्णय घेणे अपेक्षित असल्याचेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.