सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विभुतवाडी (ता. आटपाडी) येथे भाजप व शिवसेना (शिंदे) गटात जोरदार वादावादी, दगडफेक करण्याचा प्रकार घडला. या दगडफेकीत शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार वाहनाचे नुकसान झाले असून याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या निंबवडे गटामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावजय आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्या मोटे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. निवडणुक प्रचाराला वेग आला असताना विभूतवाडी येथे प्रचारादरम्यान भाजप व शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर राड्यात झाले. या घटनेत शिवसेनेच्या प्रचार वाहनाचे नुकसान झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विभूतवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची प्रचारसभा सुरू होती. याच वेळी शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी वापरण्यात येणारे वाहन त्या परिसरात आले. प्रचार वाहनावरील ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी करण्याच्या मागणीवरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रथम बाचाबाची झाली. हा वाद वाढत जाऊन काही वेळातच दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले.

या दरम्यान जोरदार शिवीगाळ झाली असून वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले होते. वादाच्या ओघात शिवसेनेच्या प्रचार वाहनाची तोडफोड करण्यात आली असून वाहनाचे नुकसान झाले आहे. घटनेमुळे गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवण्यात आला. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी हेमंत तुकाराम मोटे (वय २५) यांनी छोटा हत्ती (एम. एच. १२ डब्लू जे. ००९६)  या वाहनाचे १५ हजाराचे अज्ञात व्यक्तीने नुकसान केल्याची आटपाडी पोलीस  ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.