कोल्हापूर : कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या  कामानिमित्त कोल्हापुरात आलेला आंतरराष्ट्रीय संघटित कुख्यात बिश्नोई टोळीतील प्रमुख श्यामलाल गोवर्धन रामलाल पुनिया या उर्फ बिश्नोई तसेच श्रीराम मंजू  या दोघा गुन्हेगारांना शुक्रवारी येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. शामलाल पुनिया उर्फ बिश्नोई व श्रीराम मंजू यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

हे दोघे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कामकाजासाठी येणार असल्याची माहिती राजस्थान पोलीस व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील पोलिसांना कळवले होते. त्यानुसार  पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सूचना केल्या होत्या.  त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, उपनिरीक्षक शाम बुचड, पोलीस अंमलदार सरवडेकर ,सचिन जाधव, अमित सर्जे, निवृत्ती माळी यांचे पथक तयार केले होते.

उपरोक्त  दोघे जण सत्र न्यायालयात आले.  पोलिसांना बघून त्यांनी वाहन तळातील पांढऱ्या रंगाच्या ब्रीजा मोटारीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मुख्य प्रवेश दारावरील पोलिसांनी दरवाजा बंद केल्यावर त्यांनी मोटार वाहनतळात नेले.  तेथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

चौकशी केली असता त्यांनी आपली नावे श्रीराम मंजू वय २९ , भाटेलाई पुरोहितान, तालुका बालेसर, जिल्हा जोधपुर, राजस्थान व दुसऱ्याने शामलाल गोवर्धन राम पुण्या वय  २९ , जनसागर, जिल्हा फलोदी, राजस्थान असे सांगितले.  शामलाल पुनिया याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दरोडा, खुनासह दरोडा, बेकायदेशीर अग्नि शस्त्र कब्जात बाळगणे असे १७ गुन्हे दाखल आहेत. त्याने सन २०२०  मध्ये कोल्हापूर किनी टोल नाका येथे पोलिसांवर गोळीबार केला होता.

तेव्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी प्रत्युत्तर म्हणून त्यांच्यावर गोळीबार करून ताब्यात घेतले होते. तर श्रीराम मंजू यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, खुनासह दरोडा, बलात्कार, विनयभंग, जबरी चोरी,  घरफोडी , चोरी मारामारी, सरकारी कामात अडथळा असे २६  प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांना स्थानिक गुन्हा शाखा येथे आणण्यात आले होते. त्यांना फलोदी राजस्थान कडील पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात येणार आहे.

थरारक गोळीबार प्रकरण

२८ जानेवारी २०२० रोजी रात्री ९ ते साडेनऊच्या सुमारास कोल्हापूरमधील किणी टोल नाक्यावर जानेवारी  पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये चकमक उडाली होती. राजस्थानमधील काही कुख्यात गुन्हेगार आणि कोल्हापूर पोलीस यांच्यात किणी टोल नाक्यावर समोरासमोर धुमश्चक्री झाली.गुन्हेगारांनी पोलिसांवर रोखून गोळीबार केला, ज्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले.या धुमश्चक्रीत श्यामलाल गोवर्धन बिष्णोई (रा. जोहापूर, राजस्थान), सरवन मनोहरलाल बिष्णोई (२४) हे दोघे गँगस्टर गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला पोलिसांनी झडप घालून पकडले. श्रीराम पांचालाल बिष्णोई असे त्याचे नाव होते . या घटनेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस कर्मचारी पांडुरंग तुकाराम पाटील (वय ४५) आणि अजय वाडेकर हे जखमी झाले होते.