सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी करवीरनगरीत जोरदार तयारी सुरू झाली आहे. भव्य डान्स फ्लोअरची उभारणी, फोटो बूथ पार्टी, कोल्हापूरकरांचा लाडका डिस्क व्हिडीओ जॉकी आदित्य आणि विकी यांचा खास शो, सुप्रसिद्ध बॅले डान्सर लेनाफ हिचा आकर्षक बॅले डान्स, अग्नीच्या ज्वालांसोबत थरारक खेळणारा फायर जग्लर शो आणि खासकरून मुंबईच्या मेहराम बॉलिवूड डान्स ग्रुपचा डान्स धमाका ही थर्टी फर्स्टच्या जल्लोषी पार्टीची काही वैशिष्टय़े आहेत. विशेष म्हणजे या पार्टीचे संचलन प्रो कबड्डी लीगचा अँकर प्राड अर्थात प्रसाद क्षीरसागर करणार आहे.
करवीरनगरीत सध्या उत्साही वातावरण आहे. नाताळ, सरते वर्ष निरोप, नव्या वर्षाचे स्वागत असा उत्साही माहोल असताना त्यात सलग सुट्टय़ांची भर पडली आहे. यामुळे लोकांना मिळणाऱ्या रिकाम्या वेळेची संधी साधत नानाविध उपक्रमांचे आयोजन येथे केले जात आहे. येथील रावसाहेब वंदुरे या नामांकित ग्रुपच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी धमाल जल्लोषी पार्टीचे आयोजन केले आहे. कार्यकारी संचालक रावसाहेब वंदुरे, स्वप्नील यादव, अवधूत भोसले, विनय पाटील यांनी शहरात होत असलेल्या अनोख्या जल्लोषी कार्यक्रमाची माहिती दिली.
कोल्हापुरातील मार्केट यार्डजवळील प्रसिद्ध मुस्कान लॉनमध्ये ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. कोल्हापूरकर आपल्या संपूर्ण कुटुंबासह पार्टीत सहभागी होऊन नृत्य आणि मस्तीची धमाल लुटू शकतात. पार्टीत सहभागी होणाऱ्या कुटुंबांना वेगळी बठक व्यवस्था करण्यात येणार असून, व्हेज-नॉनव्हेज भोजनाची व्यवस्था केली आहे. या वेळी उपरोक्त वैशिष्टय़ांचा आस्वाद घेता येणार आहे.