पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला नोटाबंदीचा निर्णय क्रांतिकारक आहे. अर्थक्रांतीसाठी फक्त पन्नास दिवस त्रास सहन करा. त्यातील काही दिवसच आता उरले आहेत. त्यानंतर येणारा काळ उज्ज्वल भवितव्याचा आहे, असे मत सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. समृद्ध व महासत्ता भारत बनविण्यासाठी ‘कॅशलेस’वर भर द्या,असे आवाहनही त्यांनी केले .
हुपरी (ता. हातकणंगले) येथील पसाफंड शेतकी सहकारी बँक व लोकसेवक स्व. आ. बा. नाईक सार्वजनिक विश्वस्त निधी यांच्यामार्फत दरवर्षी देण्यात येणारे सहकार, उद्योग, समाजसेवा, शिक्षण, शेती, पत्रकारिता, सहकारी संस्था क्षेत्रातील गुणवंत्त व्यक्ती व संस्थांच्या पुरस्कार वितरण सभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. आमदार सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हळवणकर, आमदार अमोल महाडिक, अशोक स्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
[jwplayer WrSM8VvO]
देशमुख म्हणाले, की राजकारणी लोकांनी आपले राजकीय जोडे संस्थेच्या बाहेर काढून संस्थेचे हित जोपासले पाहिजे. सभासदांनी जागरूकता बाळगून वेळोवेळी आपले कर्तव्य म्हणून चुकीच्या गोष्टीचा संचालकांना जाब विचारला पाहिजे. या वेळी त्यांनी पारदर्शक कारभार करून सहकारात नावारूपास आलेल्या पसाफंड बँकेच्या कार्याचे कौतुक केले.
कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पसाफंड बँकेचे छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात कसे रूपांतर झाले, याची माहिती दिली. बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक सदाशिवराव नाईक यांनी बँकेची माहिती दिली. या वेळी विविध क्षेत्रातील गुणवंत्त व्यक्ती व संस्थांचा, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी अशोक सौंदत्तीकर, नेताजी पाटील, अरुण यादव, उमा जाधव यांनी सत्कारास उत्तर देऊन बँकेचे आभार मानले. आदर्श सहकारी – कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह. बँक इचलकरंजी, आदर्श सहकार व्यवस्थापक – नेताजी यशवंत पाटील (मंडलिक साखर कारखाना, हमीदवाडा), आदर्श समाजसेवक- अरुण यादव (सरूड, शाहूवाडी) यांच्यासह पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
[jwplayer a5j3Q5rm]
