दयानंद लिपारे

कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारण्याच्या अथक प्रयत्नांचे फळ म्हणजे शिरोळ तालुका व उत्तर कर्नाटकात सुमारे ७ हजार एकर जमीन क्षारपडमुक्त झाली असून काळय़ाभोर रानात पिके डौलाने उभी राहिली आहेत. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यांने केलेल्या या प्रयोगाला केंद्र शासनाने ११.५० कोटी रुपये अनुदान मंजूर करून आर्थिक पाठबळ दिले आहे. ही रक्कम या आठवडय़ात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याने कृषी क्षेत्रात प्रयोगातील एका रानवट यशोगाथेची नोंद झाली आहे.

supreme court rejected plea of dhangar community
धनगर आरक्षण याचिका फेटाळली; आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस न्यायालयाचा नकार
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

राज्याच्या अनेक भागांमध्ये क्षारपड जमीन ही  समस्या बनली आहे. भूमिगत नैसर्गिक निचरा कमी झाल्याने जमिनीत क्षार साचू लागतात. अशा जमिनी पाणथळ होऊन क्षार व चोपनयुक्त बनल्या आहे. उसासारखे पीक वारंवार घेताना बेसुमार पाणी, रासायनिक खताचा वापर व पिकांची फेरपालट न केल्याने जमिनी क्षारपड होतात. एका पश्चिम महाराष्ट्रातच सुमारे ७० हजार एकर जमीन क्षारपड झाली आहे. अशा उजाड शेतीकडे जाण्याचे शेतकरी टाळतात.

तथापि, ही जमीन पुन्हा पिकाखाली यावी यासाठी अनेक पातळय़ांवर प्रयत्न झाले. यापैकी दत्त कारखान्यांने राबवलेला उपक्रम उल्लेखनीय ठरला आहे. सच्छिद्र जल प्रणालीचा वापर करून क्षारपड जमीन सुधारण्याचा कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी कृतीत आणला. जमिनीत नव्याने काही उगवण्याची शक्यताच गमावून बसलेल्या शेतकऱ्यांची मनोभूमिका तयार करण्याच्या दिव्याला प्रारंभी त्यांना सामोरे जावे लागले. प्रयोगाला हात घातला तेव्हा एकरी सुमारे ७० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. स्वत:ची जमीन असूनही इतर ठिकाणी शेतमजूर म्हणून राबणाऱ्या शेतकऱ्यांकडे पैशाची वानवा होती. ही अडचण लक्षात घेऊन निर्धन शेतकऱ्यांना उदगाव सहकारी बँकेने अर्थसाहयाचा हात पुढे करण्याचे धाडस दाखवले. यातून ही मोहीम सन २०१६-१७ साली सुरू झाली. शिरोळ तालुक्यातील सात गावे, उत्तर कर्नाटकातील मंगावती, कागवाड यांसारखी काही गावांमध्ये हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबवण्यात आला. आतापर्यंत तब्बल ७ हजार एकर जमिनीत हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला असून आता तेथे ऊस, कडधान्य, गहू, भाजीपाला आदी विविध प्रकारची पिके घेतली जात आहेत.

प्रातिनिधिक यशकथा

राजू जाधव (घालवाड) हे मिळेल तेथे शेतमजुरी करायचे. क्षारपड जमीन सुधारणा उपक्रम फलदायी ठरल्याने स्वत:च्या शेतीत त्यांनी उभ्या हयातीत प्रथमच एकरी ४३ टन उसाचे उत्पादन घेतल्याचे पाहिले. काशीम मुल्लाणी (कवठेसार) यांनी सर्वाधिक ४८ टन तर महादेव मगदूम (शेडशाळ) यांनी दोन एकरात ९३ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. एकरी सरासरी तीन हजार रुपयेप्रमाणे त्यांच्याकडे लक्ष्मीची पावले दरवर्षी चालून येणार आहेत. ज्या जमिनीत कुसळही उगवणार नाही अशी ठाम धारणा झालेल्या हजारो शेतकऱ्यांची शेती आता बारमाही शेतपिकाने डवरलेली असून कृषी क्षेत्रातील अनोखा प्रयोग फलदायी ठरला आहे.

अनुदानाची उपलब्धता

क्षारपड जमीन सुधारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची संयुक्त योजना राबवली जाते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन पानथळ सुधारणा योजनेसाठी केंद्र शासन ६० व राज्य शासन ४० टक्के अनुदान दिले जाते. तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर या अंतर्गत दत्त कारखान्याने राबवलेल्या पहिल्या टप्प्यातील ३५०० शेतकऱ्यांना ११ कोटी ४६ लाख रुपये मंजूर झाले आहे. त्यातील २ कोटी १९ लाख रुपये ७ गावांतील ३६५ हेक्टर क्षारपड जमीन सुधारणा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी सांगितले. या प्रयोगाचे अनुकरण करण्यासाठी पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे संचालक तसेच शेतकऱ्यांचे समूह दत्त कारखान्याला भेट देऊन अनुकरण करू लागले आहेत, असे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील सांगतात.

मागील पिढीकडून शेतकऱ्यांना क्षारपड जमिनीचा वारसा मिळाला. ही जमीन सुपीक करणे हे बिकट आव्हान असताना शेतकरी आणि साखर कारखाना या दोहोंच्या कष्टप्रद प्रयत्नातून यश आले आहे. क्षारपड जमीन सुधारणेचा हा अनोखा प्रयोग संपूर्ण राज्यासाठी नव्हे तर देशासाठीही पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. 

– गणपतराव पाटील, अध्यक्ष, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ.