सांगली : श्रावण आणि गणेशोत्सवाच्या सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असून, किरकोळ बाजारात साखरेचा दर किलोमागे सुमारे चार रुपयांनी वाढून ६० रुपयांवर पोहोचला आहे. ठोक बाजारात साखरेचा दर ५,८०० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात घरगुती ग्राहकांवरील खर्चाचा भार वाढला आहे.

गेल्या महिनाभरापासून साखरेच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. महिन्यापूर्वी सुमारे ४,२०० रुपये प्रतिक्विंटल असलेला दर आता ५,८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अल्पावधीत झालेल्या या वाढीमुळे बाजारात साखरेच्या दराची चांगलीच चर्चा सुरू आहे. सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढत असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, साखरेच्या दरवाढीचा परिणाम गुळाच्या बाजारावरही जाणवू लागला आहे. सांगली बाजार समितीमधील गूळ सौद्यात दर वाढले आहेत. यापूर्वी ५,२०० ते ५,३०० रुपये प्रतिक्विंटल असलेला गुळाचा दर आता ५,६०० ते ५,८०० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात गुळाचा दर किलोला ६४ ते ६८ रुपये झाला आहे.

श्रावणातील धार्मिक कार्यक्रम, सण-समारंभ तसेच आगामी गणेशोत्सवामुळे साखर आणि गुळाची मागणी वाढली आहे. घरगुती वापराबरोबरच मिठाई, मोदक, लाडू आणि अन्य खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी साखर व गुळाची मागणी वाढते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारातील उपलब्धतेनुसार दरावर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.साखरेच्या दरवाढीचा परिणाम मिठाई आणि खाद्यपदार्थांच्या दरावरही होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्यास किरकोळ बाजारातील दर आणखी वाढण्याची शक्यता ग्राहकांकडून व्यक्त होत आहे