कोल्हापूर : उसाला प्रति टन ४,५०० रुपये दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर गेल्या तीन दिवसांपासून आक्रमक ‘रास्ता रोको’ आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि आर्थिक हितासाठी हे आंदोलन छेडण्यात आले असले, तरी ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर महामार्ग ठप्प झाल्यामुळे प्रवाशांसह दूध उत्पादक, वाहनचालक आणि व्यापारी वर्ग अशा अनेक घटकांना याची मोठी झळ सोसावी लागत आहे.

आज वसुबारसपासून सुरू झालेल्या या दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरी परतणाऱ्या प्रवाशांची प्रचंड कुचंबना होत असून, आंदोलनाचे पडसाद संपूर्ण परिसरावर उमटले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील चाके जागीच थांबल्यामुळे वाहनचालक, वाहक आणि प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. पेठ नाका, आष्टा, पेठ वडगाव, शिरोली या पर्यायी मार्गांवरही आंदोलनाचे पडसाद उमटू लागल्याने हे मार्गही बऱ्याच प्रमाणात ठप्प झाले आहेत.

पोटपूजेचे वांदे

आबालवृद्धांना घरी नेमके कधी पोहोचणार याची चिंता सतावू लागली आहे. प्रवासाला नेहमीपेक्षा दुपटीहून अधिक वेळ लागत असल्याने कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले असताना दुसरीकडे चहा-नाश्त्याची सोय जिकिरीची बनली आहे. दूरवरून येत असलेल्या वाहनधारकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावर चाके जागीच ठप्प झालेल्या वाहनांच्या चालक-वाहक यांचे हाल तर वेगळेच आहेत. त्यांना अंघोळीपासून चहा-नाश्ता, जेवण यासाठी पायपीट करावी लागत असून हॉटेलमधील पदार्थांचे दर दुप्पट-तिप्पट झाल्याने त्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

शेतकऱ्यांनाही फटका

दुसरीकडे या ऊस आंदोलनामुळे दुग्ध व्यवसायावरही गंभीर परिणाम दिसू लागला आहे. कोल्हापुरातून मुंबई-पुणे येथे दररोज लाखो लिटर दूध जात असते. ही वाहतूक आता खंडित होण्याच्या मार्गावर आली असून दूध संघाच्या व्यवस्थापनाने पर्यायी मार्गाने दूध पाठवण्याचा पर्याय शोधला असला तरी त्याला वेळ, खर्च अधिक लागत आहे. त्याचबरोबर, बाजार समितीतील भाजीपाल्याची आवक मंदावल्याने ऐन दिवाळीत भाजीपाला महागण्याची भीती गृहिणींनी व्यक्त केली आहे. वाहनांची अडवणूक होत असल्याने पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत होऊ शकत नसल्याने अनेक ठिकाणी पंप बंद ठेवावे लागल्याचे फलक झळकू लागले आहेत.

शासनाचे आर्थिक नुकसान

शासनालाही या आंदोलनाचा मोठा फटका बसत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोल्हापुरातून दिवसभरात तब्बल १६६ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे लालपरीचा मार्ग आता कोकण मार्गे वळवावा लागला आहे. दिवाळीत जादा गाड्या सोडून प्रवाशांची सोय करताना अधिक उत्पन्न मिळवण्याच्या परिवहन महामंडळाच्या प्रयत्नात या आंदोलनामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

नाराजीचे फटाके

एकंदरीत या स्थितीमुळे भर दिवाळी सणाच्या दिवसांत सामान्य जनतेला झालेल्या नाहक त्रासामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजीचे फटाके फोडली जाऊ लागले आहेत. शासनाने तातडीने शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात चर्चा घडवून तोडगा काढावा अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.