कराड : शेतकऱ्यांना प्रतिटन किमान साडेचार हजार रुपये ऊसदर मिळण्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढविण्याची आवश्यकता आहे. तरी, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून, केंद्र सरकारसोबत दिल्लीत लवकरच बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे.

राज्यातील ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर मुंबईतील मंत्रालयात राज्यमंत्री भोयर यांच्या दालनात भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. याबाबतची माहिती भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. त्यात ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर राज्य व केंद्र सरकारमध्ये समन्वय साधून रास्त तोडगा काढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे वेताळ यांनी पत्रकात म्हटले आहे.

ऊस दरवाढीसह साखरेची एमएसपी वाढविणे, कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल करून ऑनलाइन करणे, ऊस तोडणीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे अतिरिक्त पैसे रोखणे, शेतकऱ्यांच्या बांधावरच ऊसाची रिकव्हरी काढण्याची व्यवस्था करणे आणि ऊस वाहतूकदारांची आर्थिक पिळवणूक थांबविणे, अशा मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.

रामकृष्ण वेताळ यांनी शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. मजुरी, खते, औषधे आणि सिंचन अशा सर्वच खर्चात सातत्याने वाढ होत असताना, सध्याच्या साखर ‘एमएसपी’मध्ये वाढ झाल्याशिवाय शेतकऱ्यांना अपेक्षित ऊसदर मिळणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे केंद्र सरकारने एमएसपीमध्ये वाढ करून, ऊसदर किमान साडेचार हजार रुपये मिळण्याच्या दृष्टीने तातडीने निर्णय घ्यावा, या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी सरकारने निश्चित कालमर्यादा ठरवावी, अशी मागणी आणि आपली एकूणच भूमिका रामकृष्ण वेताळ यांनी प्रभावीपणे मांडली आहे.

किसान मोर्चाचे पृथ्वीराज पवार, महेश खराडे यांनीही ऊसदराचा प्रश्न शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी निगडित असल्याने त्यावर विनाविलंब ठोस निर्णयाची मागणी केली. भगवान काटे, सावकार मदनाईक यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींकडे मंत्री पंकज भोयर यांचे लक्ष वेधले असल्याचे रामकृष्ण वेताळ यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.