कोल्हापूर : पदवीधर पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत गोंधळ झाल्याचे चित्र असताना आता महाविकास आघाडीतही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. आज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरातील सुनील मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. सुनील मोदी हे काँग्रेसच्या माध्यमातून महापालिकेत स्वीकृत नगरसेवक असल्याने ते काँग्रेसचे की शिवसेनेचा अशी चर्चा कोल्हापुरात होत आहे. तर शिवसेनेच्या वतीने मोदी हे ठाकरे गटाचे असल्याचे असल्याचाच निर्वाळा देण्यात आला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून गेली काही दिवस स्पर्धा सुरू होती. याबाबतीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हर्षदा जाधव देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे या पक्षाचे सहकार्य घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे सरसेनापती, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने त्याची चर्चा होत आहे.

तर महाविकास आघाडीमध्ये असा गोंधळ सुरू असताना आज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने अचानक सुनील मोदी यांना अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांच्यासोबत कोल्हापुरातील एकही पदाधिकारी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी सांगितले की, कोल्हापुरात सध्या शिवसेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख उद्धव कदम यांच्या उपस्थितीत संपर्क अभियान सुरू आहे. त्यासाठी त्यांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत माझ्या बैठक्या सुरू होत्या. उपनेते संजय पवार हे आज गडहिंग्लज दौऱ्यावर होते. सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांची डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे आज कोणी पदाधिकारी अर्ज भरण्यासाठी जाऊ शकलो नाही. तथापि सुनील मोदी यांची उमेदवारी अंतिम झाल्यानंतर सर्व शिवसैनिक त्यांच्या प्रचारात ताकतीने उतरणार आहोत.

सुनील मोदी हे महापालिकेत स्वीकृत सदस्य शिवसेनेचेच म्हणून आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस की शिवसेना या वादावर बोलताना सुनील मोदी यांनी सांगितले की, महापालिकेत स्वीकृत सदस्य हा तज्ञ म्हणून निवडला जातो. त्यास कोणतीही पक्षीय, आघाडीची अधिकृत पार्श्वभूमी नसते. महापालिका निवडणुकीला मी उभा राहणार होतो. तेव्हा काँग्रेसने तुम्ही निवडणूक लढवू नका; स्वीकृत सदस्य करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे सांगितले होते. मी शिवसेनेचाच असून पक्षीय कार्यक्रमात सहभागी असतो. काँग्रेसच्या कोणत्याही पक्षीय कार्यक्रमात सहभागी नसतो. मात्र महाविकास आघाडीच्या राजकीय घडामोडी मध्ये माझा सहभाग असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.