कराड : भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. विशेषतः ‘विलीनीकरण कोणत्या पक्षाचे, कोणत्या पक्षात?’ याबाबत स्पष्टता आवश्यक असून, त्याशिवाय या विषयावर चर्चा होऊ शकत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठामपणे सांगितले. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेमागील सत्य महाराष्ट्रासमोर यावे, ही ठाम भूमिका असल्याचे ते म्हणाले.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या उपमुख्यमंत्रीपदावर निवडलेल्या सुनेत्रा पवार यांनी सोमवारी सकाळी कराडमध्ये माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला आणि वेणूताई चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या प्रसंगी खासदार सुनील तटकरे व अन्य नेतेही उपस्थित होते. यानंतर तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यशवंतराव चव्हाणांचे विचार घेवून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अडीच वर्षांत केलेली वाटचाल लक्षात घेता, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. राज्याच्या भविष्यासाठी सुनेत्रा पवार पूर्ण योगदान देतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

शपथविधीस शरद पवार, सुप्रिया सुळे यांना आमंत्रण नव्हते? या आरोपांवर तटकरे यांनी, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाने एकमताने त्यांच्या निवडीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आणि त्यानुसारच शपथविधी पार पडल्याचे सांगितले.

हीच भूमिका पुढे नेणार

‘राष्ट्रवादी’च्या विलिनीकरणासंदर्भातील शरद पवारांच्या प्रतीक्रीयेबाबत आपण बोलणार नाही. परंतु, अजित पवारांवर अंत्यसंस्कार होण्याआधीच याबाबत प्रतिक्रिया यायला लागल्या. तरी कोणत्या पक्षाच कोणत्या पक्षात विलीनीकरण? याची स्पष्टता झाल्यास यावर बोलता येईल असा सावध पवित्रा त्यांनी घेतला. आम्ही भाजपसोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून जनहितासाठी केंद्रात व राज्याच्या सत्तेत आहोत. आणि हीच भूमिका पुढे नेण्याचे आमचे कर्तव्य असल्याचे तटकरेंनी स्पष्ट केले.

राऊतांच्या बोलण्याला महत्व नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपने ‘गिळंकृत’ केल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपावर तटकरे त्यांच्या बोलण्याला फार महत्व नसल्याचे स्पष्ट करत. आमचे विचार, धोरणे व भूमिका स्वतंत्र असून, विधानसभा निवडणुकीत १३ कोटी जनतेने आमच्या भूमिकेला कौल दिल्याचे त्यांनी सांगितले.

आधी खुलासा मग, बोलेन

शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिल्यानंतर आपल्या गटाकडून प्रतिक्रियाच नाही? या प्रश्नावर तटकरे यांनी कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार, याचा खुलासा आधी झाला पाहिजे. त्यानंतरच यावर स्पष्ट भूमिका मांडता येणार असल्याचे सांगितले.

विजय वडेट्टीवारांवर टीका

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ म्हणून कट रचला जात असल्याच्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर तटकरे यांनी ‘आधी काँग्रेसने चंद्रपूरचा महापौर कोणाचा होतोय ते पाहावे. काँग्रेसमध्येच पळवा- पळवी सुरू असताना, वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोला लगावला.

योग्यवेळी भूमिका मांडू

आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून ४१ जागांवर विजयी झालो असून, राष्ट्रवादी विधिमंडळ मजबूत आहे. नेता निवडीचा अधिकार हा केवळ निवडून आलेल्या सदस्यांनाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विलीनीकरणासंदर्भात यापूर्वी झालेल्या चर्चा पुराव्यांसह समोर आणण्याच्या दाव्यावर बोलताना, योग्यवेळी भूमिका मांडली जाईल, असे त्यांनी सांगितले.

‘खलनायक’ आरोप फेटाळला

या घडामोडींमध्ये आपण आणि प्रफुल्ल पटेल ‘खलनायक’ ठरत असल्याचा आरोप फेटाळताना तटकरे म्हणाले, भाजप हा देशातील प्रमुख पक्ष असून, राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या सहमतीने सत्तेत सहभागी आहे. भाजपने कधीही आमच्या पक्षाचे निर्णय ठरवलेले नाहीत. शिव- शाहू- फुले- आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र भूमिका घेणारा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

दुर्घटनेमागील सत्य समोर यावे

दरम्यान, अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत व्यक्त होत असलेल्या संशयांवर तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिलेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानेही चौकशी सुरू केली असून, दुर्घटनेमागील सत्य जनतेसमोर आले पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम भूमिका असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.