|| दयानंद लिपारे

राजस्थानीमधील गुंड जेरबंद

कोल्हापूर : हाती उणापुरा पाऊण तासाचा अवधी. प्रसंगावधान राखत त्वरेने हालचाली करून कोल्हापूर पोलिसांनी ‘त्या’ गुंडांना काबुत आणणारी यंत्रणा तैनात केलेली. ईप्सित स्थळी गुंड पोहोचले, पण त्यांनी पोलीस असल्याची पर्वा न करता त्यांच्यावरच गोळीबार सुरू केला. त्यांना धडा शिकवण्यासाठी प्राणपणाने बाजी लावत पोलीस अधिकाऱ्यांनी गुंडांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. म्होरक्या जखमी झाल्याने अन्य दोन गुंडांचे अवसान गळाले. काही कळायच्या आत तिघेही खतरनाक गुंड पोलिसांच्या तावडीत सापडले.

श्वास रोखायला लावणारा हा प्रसंग. अगदी काही वेळातच घडला. राजस्थानातील धोकादायक टोळी कोल्हापुरातील पोलिसांच्या हाती लागणारी ही मोहीम फत्ते करण्यात पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचे धाडस महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे आज कोल्हापुरात समाज माध्यमात ‘ तान्हाजी’  चित्रपटातील नायकाप्रमाणे खाकी वर्दीतील हा ‘तानाजी’ ही चर्चा आणि कौतुकाच्या केंद्रस्थानी राहिला.

याचे घडले असे.. राम पाचाराम बिष्णोई, शामलाल गोवर्धन राम पूनिया ऊर्फ विष्णू व श्रवणकुमार मनोहरलाल हे राजस्थानातील पंचविशीतील अट्टल गुंड हुबळीमध्ये होते. राजस्थान पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यामुळे गुंडांनी पुण्याच्या दिशेने जाण्याचे ठरवले. जाण्यापूर्वी या गुंडांनी राजस्थानी पोलिसांच्या तपास पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून धमकी दिली. ‘येथे पकडायचा प्रयत्न कराल, पण राजस्थानमध्ये आल्यावर तुमची खैर असणार नाही’ अशा शब्दात गुंडांनी पोलीस अधिकाऱ्यांना धमकावले.

दरम्यान, गुंड आणि त्यांच्या पाळतीवर असणारे पोलीस यांच्यातील अंतर वाढत राहिले. राजस्थानी पोलिसांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून गुंडांना पकडण्यासाठी सूचित केले. त्याक्षणी गुंड असलेले स्थळ आणि ते कोल्हापुरात पोहचण्याचे अंतर लक्षात घेऊन त्यांनी यंत्रणा सतर्क केली. अंतराच्या मानाने अवघा पाऊण तास हाती होता. हे लक्षात घेऊन त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे व वडगाव पोलीस ठाणे येथील पोलीस आणि अधिकारी किणी टोल नाका येथे तैनात केले. तेथील ‘फास्टॅग लेन’ यंत्रणा थांबवली. पोलिसांना साध्या वेशात तैनात राहण्यास सांगितले. गुंड धोकादायक असल्याने त्यांच्याकडून गोळीबार होण्याची शक्यताही गृहीत धरून यंत्रणा सतर्क केली. प्रवासी आणि इतर कोणालाही त्रास होणार नाही, अशी आखणी केली.

अपेक्षेप्रमाणे गुंडांची मोटार टोल नाक्यावर आली. त्यावर पोलीस पांडुरंग पाटील व नामदेव यादव यांनी त्यांना रोखले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगूनही मोटारीत मागे बसलेल्या गुंडाने शिवीगाळ करीत थेट गोळीबार करण्याचा आदेश दिला. चालकाशेजारी पुढे बसलेल्या गुंडाने बेधडकपणे पोलिसांवर गोळीबार सुरू केला.

पोलीस खाली वाकले. ते पाहून गुंडांनी मोटारी बाहेर येऊन पुन्हा गोळीबार सुरू ठेवला. त्यासरशी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी प्रसंगावधान राखून प्रतिकार करण्याच्या दृष्टीने गोळीबार केला. त्यांनी झाडलेली तिसरी गोळी गोळीबार करणाऱ्या गुंडाच्या पायाला लागली. तो जखमी होऊन खाली वाकला. त्याने हात टेकल्याचे पाहून मोटारीतील अन्य दोन गुंडांचेही अवसान गळाले. तिघांनीही शरणागती पत्करली. पोलिसांनी त्यांना कडे करून क्षणार्धात जेरबंद केले.