आपण पर्यावरणाचे विश्वस्त आहोत, मालक नव्हे; त्यामुळे आपल्याला स्वच्छ पर्यावरण पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करावयाचे आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विकास हे आपले आद्य कर्तव्य आहे . पर्यावरणाला महत्त्व दिल्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही, असे मत पर्यावरण शास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. डॉ. जय सामंत यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या आणि मास कम्युनिकेशन आणि युनिसेफ (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘सामाजिक हिंसा आणि शोषण’ या विषयावर आयोजित ओरिएनटेशन कार्यक्रमात ते बोलत होते.

‘नाइन इज माईन’ या संस्थेच्या राज्य समन्वयक सारा फर्नाडीस यांनी विद्यार्थ्यांना ‘बाल हिंसा आणि संरक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी  त्या म्हणाल्या की, देशाच्या सकल आíथक उत्पनाच्या फार कमी खर्च हा बालकांच्या संरक्षणावर केला जातो. आपल्या संबोधनात त्यांनी देशातील वाढत्या बाल हिंसा यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

युनिसेफ महाराष्ट्रचे कम्युनिकेशन सल्लागार तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना युनिसेफबद्दल माहिती देऊन युनिसेफच्या कार्यात विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी मार्गदर्शन केले. जनसंवाद क्षेत्रात विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रा. प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘बाल हिंसा आणि प्रतिबंध’ या विषयावरील कायदेशीर तरतुदीबद्दल मार्गदर्शन केले. भारतीय राज्य घटना, भारतीय दंड विधान, ‘पोकसो’ कायदा आणि अन्य कायदेशीर तरतुदींची माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वृत्तपत्र विद्या आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार यांनी  प्रास्ताविक केले.  सूत्रसंचालन चंद्रशेखर वानखेडे आणि राजेश्वरी बांदेकर यांनी केले. या प्रसंगी डॉ. सुमेधा साळुंखे, सुनील जाधव, सुधाकर बग्रे, दीपक कुन्नुरे आणि विद्यार्थी उपस्थित होते.