कोल्हापूर : नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदानाच्या जाचक अटी काढणेसंदर्भात शासनाने आदेश काढलेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर १३ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिली.

स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची आज कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली.यावेळी शेट्टी म्हणाले, दोन दिवसापुर्वी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाचक नियम व अटी रद्द करून ५० हजार रूपयांचे अनुदान देण्यासंदर्भात शासन निर्णय झाल्याचे सांगितले होते. २८ जुलैच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुधारित निर्णयाला मान्यताही घेण्यात आलेली होती.
दोन रेड्यांच्या टकरीत
अल्पमतातील सरकारच्या मंत्रीमंडळाचे निर्णय लागू होत नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ५० हजार रूपये उपलब्ध होण्यासाठी निधी वितरीत केलेला नाही. मंत्रालय स्तरावर चौकशी केली असता हा निर्णय नव्याने घेतला तरच शेतकर्‍यांना पैसे मिळणार आहेत असे मला सांगण्यात आले आहे. दोन रेड्यांच्या टकरीत भिंतच उद्ध्वस्त होते, अशी अवस्था झाल्याने नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे मिळणे अशक्य झाले आहेत. सध्या पेरणीचे दिवस असल्याने पैसे मिळणे गरजेचे आहे. कोणतेही निकष न लावता तातडीने पैसे वर्ग करावेत, ऊस उत्पादक शेतकर्‍यांना २०० रूपयेचा दुसरा हप्ता द्यावा, रासायनिक खतांचे वाढलेले दर मागे घ्यावेत या तीन मागण्यांसाठी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.