कोल्हापूर : राज्यशासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केली आहे. त्यांना रास्त मदत मिळावी, या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी (२३ ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, सन २०१९ पेक्षा या वेळेच्या पुराची तीव्रता अधिक आहे. नागरिक, ग्रामस्थ, विक्रेते, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेली मदत अपुरी आहे. सरकारी आकडा भला मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात मिळणारी मदत ही अल्प स्वरूपाची असणार आहे. शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. मागील पुराच्या तुलनेमध्ये ही मदत खूपच कमी आहे. ऊस शेतीसाठी एकरी ५४०० रुपये मिळणार असून खराब उस शेतातून काढण्यासाठी शेतकर्‍यांना दहा हजार रुपये खर्च करावा लागणार .आहे सोयाबीन,भुईमुग यासाठी एकरी २७०० रुपये इतकी अत्यल्प मदत देवून राज्यशासन शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे

यामुळे या भावना व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे,कृष्णेच्या उपनद्यांच्या पुलावर मोऱ्या बांधाव्यात, पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे, कृष्णा उपनद्यांच्या पुराचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट नियुक्त करण्यात यावा, पूर्वीची कर्जमाफीची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रा. जालंदर पाटील, वैभव कांबळे, सावकार मादनाईक, सागर शंभूशेट्टी, जनार्दन पाटील, रमेश भोजकर आदी उपस्थित होते