सातारा: ​उसाला प्रतिटन पहिली उचल ४ हजार ५०० रुपये आणि अंतिम दर ५०० रुपये मिळावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अत्यंत आक्रमक भूमिका घेत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे (ता. सातारा) येथे तीव्र चक्काजाम आंदोलन छेडले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली किनी टोलनाक्यावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून, मंगळवारी दुपारपासून सुरू करण्यात आलेले आंदोलन रात्री उशिरापर्यंत हजारो शेतकरी महामार्गावरच ठिय्या मांडून बसले होते.

आज बुधवार सकाळपासूनही महामार्ग ठप्प आहे. साताऱ्याहून कोल्हापूर कडे जाणारी आणि कोल्हापूरहून साताऱ्याकडे येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती धुडकावून लावत शेतकऱ्यांनी रात्रीचे जेवण महामार्गावरच उरकले. साखरेचे वाढलेले दर, इथेनॉल निर्मितीचे उत्पन्न आणि राज्य सहकारी बँकेने साखरेचे केलेले प्रतिक्विंटल ४,२०० रुपयांचे मूल्यांकन पाहता कारखानदारांनी ४,५०० रुपयांची पहिली उचल देणे सहज शक्य आहे. मात्र, कारखानदार आणि प्रशासन संगनमत करून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक व शेतकरी प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. मात्र, ठोस निर्णयाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्काराची घोषणा केली आहे. महामार्ग आनेवाडी टोलनाक्यापासून बंद आहे.

​वाहतूक पूर्णपणे कोलमडली; प्रवाशांचे हाल

​या चक्काजाम आंदोलनामुळे पुण्याकडून कोल्हापूरकडे आणि कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आज सकाळपासूनच नागठाणे ते गौरीशंकर कॉलेजदरम्यान वाहनांच्या अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. संपूर्ण परिसर ठप्प झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गावर तणावाचे वातावरण असल्याने अतिआवश्यक काम नसल्यास नागरिकांनी सातारा मार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

​आंदोलनातून माणुसकीचे दर्शन

​१२ ते १५ महिने काबाडकष्ट करून पिकवलेल्या उसाला घामाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका प्रवक्ते अनिल पवार यांनी मांडली. महामार्ग पूर्णपणे रोखला गेला असला तरी, आंदोलकांनी तातडीच्या उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकांना तत्परतेने मार्ग मोकळा करून देत सामाजिक भान आणि माणुसकी जपली. ​या आंदोलनात राजू शेळके, राजू केजळे, नंदकुमार नलवडे, अर्जुन साळुंखे, वसीम इनामदार, देवानंद पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. सायंकाळी साताऱ्याचे तहसीलदार समीर यादव यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरल्याने, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.